मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्याची तसेच अजितदादांच्या नावे ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

अर्थमंत्री म्हणून तब्बल ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाले. अजितदारांनी यंदाचा १२ वा अर्थसंकल्प मांडण्याची तयारीही सुरू केली होती. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे यंदाचा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आली. फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करताच सभागृहात अजितदादा ‘अमर रहे’ अशा घोषणा देत सदस्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. मग मुख्यमंत्र्यांनीही, आज हे भाषण करताना मन अत्यंत जड झाल्याचे सांगत दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प समर्पित करीत असल्याचे जाहीर केले.

सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घकाळअर्थ विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी एकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झालेले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. ‘काम करणारा माणूस’ ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचे सांगत फडणवीस यांनी अजितदादांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. तसेच अजितदादांच्या नावे ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ देण्याची घोषणाही केली.