मुंबई: विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण असून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल. फेलोंनी फेलोशिपच्या अनुभवातून आपल्या कार्यक्षेत्रात परिवर्तन घडविण्याचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या कृतज्ञता आणि नवीन तुकडीच्या स्वागत सोहळ्यात फडणवीस बोलत होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ.ज्योत्स्ना पडियार, वरिष्ठ अधिकारी, आयआयटीचे प्राध्यापक, फेलोशिप कार्यक्रमाचे समन्वयक आणि सीएम फेलोज उपस्थित होते.
शासनामध्ये अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण अधिकारी असले तरी दीर्घकाळ एकाच पद्धतीने काम करताना कल्पकता आणि ग्राउंडशी असलेला संपर्क काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनात नवे विचार आणणे आणि त्याचवेळी तरुणांना शासनाची कार्यपद्धती समजून देणे, हा फेलोशिप कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रारंभीच स्पष्ट करीत फडणवीस यांनी ‘फेलोशिप’ हा एकतर्फी अनुभव नसून फेलोंकडून प्रशासनालाही नवे विचार आणि दृष्टिकोन मिळत असल्याचे सांगितले. नवीन पिढीच्या आकांक्षा आणि कार्यपद्धती समजून घेतल्याशिवाय सर्वसमावेशक प्रशासन शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने बदल स्वीकारत अधिक गतिमान होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमुद केले.
सीएम फेलोंनी स्टार्टअप धोरण, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डॅशबोर्ड्स, जलयुक्त शिवाराचे जीआयएस मॅपिंग, ‘मागेल त्याला शेततळे’, ई-गव्हर्नन्स, तक्रार निवारण व्यवस्था, चॅटबॉट्स तसेच महाराष्ट्र युनिक इन्फ्रा आयडी यांसारख्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले. प्रशासनामध्ये बदलासाठी केवळ शासन निर्णयाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. लोकाभिमुख आणि सोपी कार्यपद्धती आधी स्वीकारून त्यानुसार शासन निर्णय करण्याची नवी कार्यसंस्कृती विकसित झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सरकारच्या १०० दिवसांच्या आणि १५० दिवसांच्या कार्यक्रमांतही फेलोंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आवास योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, लखपती दीदी, शेतकरी व महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामातही फेलोंनी प्रभावी भूमिका बजावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘मी एकटा किती परिवर्तन करू शकणार’ असा विचार न करता परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी. फेलोशिपमधून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग समाजाच्या आकांक्षा आणि गरजा समजून घेण्यासाठी करावा आणि आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. नवीन तुकडीने मागील तुकडीपेक्षा अधिक चांगले आणि नावीन्यपूर्ण काम करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे सांगून फडणवीस यांनी नवीन फेलोंना शुभेच्छा दिल्या.
शासनाच्या विविध योजना आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर जाऊन जनतेशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि प्रशासनात आवश्यक ते सुलभीकरण सुचविणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री फेलोंनी ‘फिल्ड’मध्ये अधिकाधिक काम करून अर्थपूर्ण अभिप्राय प्रशासनाला द्यावा, असे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी केले.
विविध क्षेत्रांतील सल्लागार शासनाला मार्गदर्शन करतात; मात्र मुख्यमंत्री फेलोंचा अनुभव यापेक्षा वेगळा आहे. फेलोंनी गावांमध्ये जाऊन ग्रामस्थ, क्षेत्रीय कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा सेविका आदींशी प्रत्यक्ष संवाद साधावा. क्षेत्रातील वास्तव समजून घेतल्यामुळे प्रशासनाला अधिक उपयुक्त आणि व्यवहार्य सूचना देता येतात. प्रत्येक फेलोने आपली आवड, क्षमता आणि कौशल्य यानुसार विषय निवडून त्यात योगदान द्यावे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी फेलोंना उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासनातील तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच क्षेत्रीय वास्तव समजून घेण्यावर भर देताना अग्रवाल यांनी नवीन ॲप्लिकेशन्स आणि डिजिटल साधने तयार करणे महत्त्वाचे आहे. मात्र त्यापेक्षा क्षेत्रीय पातळीवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेणे अधिक गरजेचे असल्याचे सांगितले. क्षेत्रीय पातळीवर कोणते सुलभीकरण करता येईल, तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कोणता अर्थपूर्ण अभिप्राय देता येईल, यावर फेलोंनी लक्ष केंद्रित करावे अशा सूचना दिल्या.
