मुख्यमंत्र्यांची तारेवरची कसरत

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांकडून जोरदारपणे पुन्हा लावून धरली जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधक आणि शिवसेनेच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागणार; ज्येष्ठ मंत्री लक्ष्य?

शिवसेनेच्या सत्तासहभागामुळे सरकारला स्थिरता मिळाली असली, तरी विरोधकांबरोबरच शिवसेनेच्या हल्ल्यांनाही तोंड देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तूरडाळीसह डाळींची प्रचंड दरवाढ, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच असणे, फसलेली सावकारी कर्जमाफी, शनििशगणापूरला महिलांना शनिचौथऱ्यावर प्रवेश, ढासळलेली कायदा व सुव्यस्था आदी मुद्दय़ांवर विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न होणार आहेत.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांकडून जोरदारपणे पुन्हा लावून धरली जाणार असून, सत्ताधारी शिवसेनेची शेतकऱ्यांच्या प्रश्नी विरोधकांना साथ राहणार आहे. गिरीश बापट, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी मंत्र्यांना विरोधकांकडून लक्ष्य केले जाणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने विरोधकांबरोबरच शिवसेनेनेही नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्याच्या सूचनाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. संपूर्ण कर्जमाफीची मागणी राज्य सरकारने फेटाळली होती, पण यंदाचा दुष्काळ तीव्र असून पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर असल्याने संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा काँग्रेसकडून मांडला जाण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याला पािठबा दिला जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या अधिवेशनात एकजूट दाखवून सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील साटेलोटय़ाची चर्चा होत असली आणि भाजप नेत्यांच्या बारामती वाऱ्या होत असल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधाची धार अधिवेशनात वाढण्याची चिन्हे आहेत.

आíथक परिस्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असून लोकप्रियतेसाठी घोषणा करता येणार नाहीत, याचे भान वर्षभरात सरकारला आले आहे.

त्यामुळे मंत्रिमंडळाची बठक मराठवाडय़ात घेण्याचे जाहीर करूनही मदतीचे वेगळे पॅकेज देता येणे शक्य नसल्याने ती घेतली गेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने भाजप व शिवसेनेतील इच्छुकांमध्ये नाराजी असून, त्यांना सांभाळून विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देताना मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.

डाळींवरून बापटांना घेरणार

युतीच्या आधीच्या सरकारमध्ये मंत्री शोभाताई फडणवीस अडचणीत आल्या होत्या. त्याचप्रमाणे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना विरोधकांकडून घेरले जाणार असून राजीनाम्याची मागणी लावून धरली जाणार आहे. बापट यांनी १०० रुपये प्रतिकिलो पर्यंत तूरडाळीचे दर उतरतील, हे सांगून महिना झाला तरी तूरडाळ, उडीदडाळ, मूगडाळींचे दर २०० रुपये प्रतिकिलोच्या घरात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट बापट यांच्यावर गरव्यवहाराचाच आरोप केला असून, अधिवेशनात डाळींना झणझणीत फोडणी मिळून सरकारची मात्र कोंडी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cm is unstable

ताज्या बातम्या