काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची नारायण राणे यांना प्रतीक्षा असली तरी हा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजूनही फारसे उत्सुक नसल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते.  मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर राणे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हा सोनियांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह सोनियांची भेट घेणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले होते. पण अशा बैठकीसाठी पुढाकार घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले. सोनिया गांधी यांच्याकडून निरोप आला तरच राणे यांच्याबरोबर बैठकीला जाण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येते. राजीनामा देऊन दहा दिवस उलटले तरी राणे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रचार समितीचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे.