देशातील ऊर्जाक्षेत्रातील १०० दिवसांच्या कामगिरीची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपुऱ्या कोळशामुळे उभ्या ठाकलेल्या वीजप्रश्नावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवल्याबाबत विचारले असता गोयल यांनी चव्हाण यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. ऊर्जाप्रश्नावर देशातील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. पण अनेकदा प्रयत्न करूनही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होऊ शकली नाही. वीजप्रश्नाबाबत चव्हाण फारसे गंभीर नसून ते बहुधा इतर कामांमध्ये व्यग्र असावेत, त्यांना केवळ राजकारण करायचे आहे, असा टोला गोयल यांनी लगावला. काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळेच ऊर्जा क्षेत्रातील प्रश्न तीव्र झाले आहेत. खुद्द चव्हाण त्या काळात पंतप्रधान कार्यालयात मंत्री होते. त्यांच्या चुकांचा पाढा वाचायला सुरू केला तर कठीण होईल, असा इशाराही गोयल यांनी दिला.
महाराष्ट्राने केंद्रीय कोटय़ातून जादा वीज मागितलेली नाही. महाराष्ट्राने खासगी वीज कंपन्यांबरोबर केलेले करार आणि नंतर आयात कोळशाची झालेली दरवाढ यातून वाद झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वाढीव खर्चापोटी जादा वीजदर वसूल करण्याला नकार दिला आहे. त्यामुळे खासगी वीज कंपन्यांनी महाराष्ट्राला वीजपुरवठा बंद केला तर त्यात केंद्र सरकारचा काय संबंध, असा सवाल करत गोयल यांनी चव्हाण हे अनाठायी केंद्राकडे बोट दाखवतात, असे गोयल म्हणाले.

वीजनिर्मिती, पारेषण, वितरण याबरोबरच कोळसा खाणी, पवनऊर्जा, सौरऊर्जा या बाबतीत महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारच्या ढिसाळ कारभारामुळेच आता वीजप्रश्न तीव्र झाला आहे. वीजप्रश्नाबाबत पृथ्वीराज चव्हाण फारसे गंभीर नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे.      
– पीयूष गोयल, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री