संतापलेल्या मुख्यमंत्र्यांचा प्रकाश मेहता आणि अधिकाऱ्यांना खडा सवाल

गेल्या वर्षभरात गृहनिर्माण विभागात केवळ अमुक लाख तमुक लाख घरे बांधण्याच्या घोषणा आणि चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. आपण स्वत: सहा बैठका घेतल्या. तुम्ही जे सांगाल, मागाल त्याला हो म्हटले. मात्र वर्षभरात केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काही झालेले नाही. एकही घर बांधले नाही. त्यामुळे गृहनिर्माण विभागाच्या कारभाराबद्दल आपण बिलकूल समाधानी नसून आता चर्चेचे गुऱ्हाळ थांबवा आणि प्रत्यक्षात घरे कधी बांधणार ते सांगा, अशा कडवट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गृहनिर्माण विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढल्याने उपस्थित अधिकारी आवाक् झाले. मुख्यमंत्र्यांचा चढलेला पारा पाहून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हेसुद्धा निरुत्तर झाले.
राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक विभागाचे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वॉररूमची संकल्पना सुरू केली. या बैठकीत एका वेळी एकाच विभागाच्या प्रकल्पांवर चर्चा होऊन त्वरित निर्णय घेतले जातात. अशाच प्रकारे गृहनिर्माण विभागाच्या रखडलेल्या योजनांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज वॉर रूममध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह नगरविकास, गृहनिर्माण, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनी, धारावी पुनर्विकास प्रकल्प, एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गृहनिर्माणाच्या विविध योजनांवर चर्चा झाली. तसेच कोणत्या योजनच्या माध्यमातून किती घरे निर्माण होणार आहेत, कोणत्या योजनेत अडचणी आहेत, त्यावर कशी मात करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र केवळ चर्चाच सुरू असून त्यातून ठोस काहीच निघत नसल्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आपला नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करीत मंत्री आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याचे समजते. वर्षभर केवळ चर्चेचेच गुऱ्हाळ ऐकतोय. तुम्ही सांगाल त्याला हो म्हटले. वर्षभरात एकही नवीन घर नाही अशा शब्दात फटकारले.

चार वर्षांत केलेल्या घोषणांप्रमाणे घरे कधी उपलब्ध होणार. म्हाडा, एसआरए, धारावी प्रकल्पातून एकही घर झालेले नसून या विभागात कागदी घोडे नाचविण्याच्या पलीकडे काहीही सूर नाही. कारभारात सुधारणा करा.