मुंबई: राज्यात संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास, उद्योग संलग्न उच्च शिक्षण उत्कृष्ठता केंद्रे यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठे शासकीय महाविद्यालये, संस्था आणि तंत्रनिकेतनमध्ये संशोधनास चालना देण्यासाठी सीएम सृष्टी योजना ( CM-SRISTHI- Scheme for Research, Innovations and Technological Hubs In Higher Education Instititions) अंमलात आणण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्राचे ध्येय साकरण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षणाचे योगदान महत्वाचे राहणार आहे. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञान विकसित होणे आणि उच्च तंत्रज्ञान अवगत असणारे मनुष्यबळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सीएम सृष्टी योजना अंमलात आणण्यास मान्यता देण्यात आली. योजनेचा कालावधी २०२६-२७ ते २०३०-३१ असा असेल. त्यानंतर सविस्तर आढावा घेऊन योजनेत आवश्यक ते बदल करण्यात येतील.
योजना खालील संस्थांत राबवविणार
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व सार्वजनिक विद्यापीठे, सर्व शासकीय उच्च आणि तंत्रशिक्षण संस्था, सर्व शासकीय तंत्रनिकेतने, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई, काँलेज आँफ इंजिअनिअरिंग तंत्रज्ञान विद्यापीठ, डाँ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड या संस्थेत ही योजना राबवली जाणार आहे.
योजनेचे घटक
योजनेत विद्यापीठांमधील उत्कृष्ठता केंद्रे स्थापन करणे अपेक्षित आहे. ही केंद्रे डीप टेक आणि फ्रंटिअर टेक्नाँलाँजी क्षेत्रातील संशोधनाकरिता मदत करतील. विद्यापीठात स्वतंत्र तंत्रज्ञान विभाग स्थापन करणे आवश्यक आहे. या विभागात पदव्युत्तर, डाँक्टरोल तसेच पोस्ट डाँक्टरोल संशोधन कार्यक्रमावर भर देण्यात येईल. शैक्षणिक प्रशिक्षण बाजाराच्या गरजांशी सुसंगत करण्यावर भर दिला जाईल. यासाठी उद्योगजगताशी भागीदारी करण्यावर भर असेल. राज्यातील तांत्रिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनना अत्याधुनिक करण्याची आवश्यकता आहे. पारंपरिक शिक्षण पध्दती बदलून इंडस्ट्री ५.० च्या गरजांशी सुसंगत अभ्यासक्रम लागू करण्यात येतील. उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यावरही या योजनेत भर दिला जाणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आकर्षित करणे, आंतरराष्ट्रीय संस्थांना आकर्षित करणे, परदेशी विद्यापीठांच्या शाखा, कँम्पसचे सह-स्थानिकीकरण करणे यावर भर दिला जाणार आहे. मेटा विद्यापीठे, कृत्रिम बुध्दिमत्ता विषयातील उत्कृष्ठता केंद्रे, संशोधन निधी, संशोधन पार्क, कार्पोरेट सामाजिक दायित्व, मादी विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्र निधी यांचाही या योजनेत विचार केला जाणार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीची तत्वे
राष्ट्रीय आणि जागतिक मानकांशी तुलना करणे, उद्योग-व्यवसाय सहकार्य अपेक्षित आहे. परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार आवश्यक राहील.योजनेच्या कालावधीनंतर स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर अथवा विद्यापीठाने आर्थिक भार उचलणे अपेक्षित आहे. योजनेचे सर्व प्राधान्य संशोधनाला राहिल, बांधकामे कमीत कमी राहतील. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील अग्रगण्य संस्थांशी सहकार्य आणि मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. योजनेकरिता मार्गदर्शक तत्वे शासन निर्णयाव्दारे निश्चित करण्यात येणार आहेत.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. यामध्ये वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सदस्य असतील. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे अध्यक्ष, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, उद्योग-शैक्षणिक भागीदारी तज्ञ, संचालक, उच्च शिक्षण, संचालक, तंत्र
शिक्षण समितीचे सदस्य असतील. त्याचबरोबर या समितीत आयआयटी, मुंबई, आयआयएम, मुंबई आणि नागपूर, आयआयएसईआर, पुणे, टाटा इन्सिट्यूट आँफ फंडामेंटल रिसर्च, रसायन, तंत्रज्ञान संस्था, मुंबई, डाँ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, संबंधित विषयातील तज्ञ यांचा आवश्यकतेनुसार समावेश करण्यात येईल. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक समितीचे सदस्य सचिव असतील.
