मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. “एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी.”, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. “मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे  ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करा.”, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक  संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे,  सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना

  • महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.
  • महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी.
  • प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र  वेळोवेळी भेटी द्याव्यात.
  • स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणी देखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.
  • महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.
  • गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे  शहरात उर्वरित महत्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी

१ महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा  

मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घटनेतील सर्व न्यायवैद्यकीय , इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे तसेच कुठेही कमतरता राहणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे तसेच न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता उद्यापासूनच विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून काम सुरु करावे असेही निर्देश दिले.

जलदगती न्यायालयात खटला चालवणार

हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईल असे पाहून पिडीत दुर्दैवी महिलेस न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई हे देशातील एक सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. लोकांचा पोलिसांवर आणि कायदा व सुव्यवस्था यावर विश्वास आहे. मात्र अशा घटनेमुळे आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray called an urgent meeting of all senior police officers rmt
First published on: 11-09-2021 at 20:35 IST