scorecardresearch

डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

आम्ही आमची कॅबिनेट बैठक डेक्कन ओडिसीच्या रेल्वे किंवा त्या विमानात घेऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी कली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आज (27 सप्टेंबर) आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलीय. आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी राज्याच्या पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि राज्याचं अर्थखातं त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा लवकर सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक त्या रेल्वे किंवा विमानात घेऊ. पण थोरात साहेब आपल्यावर जबाबदारी असेल की या प्रवासाच्या काळात आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण तिथं पोहचून परती प्रवास सुरू झाला तरी आपली कॅबिनेट संपली नाही तर पंचायत होईल. आपण हे आव्हान घेतलं पाहिजे. डेक्कन ओडीसीमध्ये कॅबिनेट नक्की करणार आहोत.”

“पर्यटन विभागाने लॉकडाऊनमध्येही नवं धोरण आणत सुविधा निर्माण केल्या”

“लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका पर्यटनाला बसला. या काळात निर्बंध असतानाही नवे धोरणं आणली, नव्या सुविधा निर्माण केल्या, नवे रोजगार तयार केले त्यासाठी मी पर्यटन विभागाचे मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. आजचं फोटो प्रदर्शन महाराष्ट्राच्या वैभवाचं ऐश्वर्याचं प्रदर्शन आहे. दुर्दैवाने या खात्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आता त्याला चांगलं महत्त्व दिलं जातंय,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“देशातल्या 1200 पैकी 800 लेण्या महाराष्ट्रात, आता आजच्या युगातील लेणी तयार करायला हवी”

उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातील लेण्यांवर अधिक भर दिला. ते म्हणाले, “देशभरात जेवढ्या लेण्या आहेत त्यातील सर्वाधिक म्हणजे 1200 पैकी 800 लेणी महाराष्ट्रात आहेत. यातील 90 टक्के लेण्या अजूनही आपल्याला माहिती नाही. हजारो वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने लेणी कोरल्या तशा आज निर्माण करता येतील का? आपणही एक आजच्या युगातील लेणी तयार केली पाहिजे. केवळ जुनं जतन करणं नाही तर नवंही तयार केलं पाहिजे. बार्सिलोनामध्ये पुरातन काळापासून निर्माण केलं जाणारं चर्च आहे. त्यात सुरुवातीपासून आजपर्यंतच्या शैलीचं काम पाहायला मिळतं.”

“महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको,” अशी सूचना त्यांनी पर्यटन विभागाला केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray declare cabinet meeting in deccan odyssey train for tourism pbs

ताज्या बातम्या