सारथीला भूखंड उपलब्ध होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज (२६ मे) सारथे संस्थेच्या भूखंडासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Uddhav Thackeray one more chief minister who not completed his term
कार्यकाळ पूर्ण न करणारे उद्धव ठाकरे आणखी एक मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज (२६ मे) सारथे संस्थेच्या भूखंडासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जनतेला मास्क वापरत रहा असं आवाहनही केलं. सध्या राज्यात ४०१ टँकर्स सुरू आहेत, तसेच धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हरभरा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी खरेदी कालावधी २८ जूनपर्यंत वाढविण्याची विनंती केंद्राला करण्यात आली आहे, अशीही माहिती देण्यात आली.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर ३७, मधील ३ हजार ५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केली आहे. सारथी संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर,अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र, जेष्ठ नागरीक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इत्यादी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी ५०० मुलांचे व ५०० मुलींचे स्वतंत्र निवासी वसतीगृह देखील विकसित करण्यात येईल.

याअंतर्गत नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर ३७ मधील ३५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक, ४०१ टँकर्स सुरू

राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात २५ मे अखेर ३६.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या याच काळात हे प्रमाण ३६.२७ टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी शासन जलसाठयाचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत आहेत. सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात १९२४ दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या ४७.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

हेही वाचा : “मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार”, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचे ‘हे’ ३ निर्णय

यापाठोपाठ मराठवाडा विभागात ३ हजार ३२७ दलघमी म्हणजे ४५.१३ टक्के, कोकण विभागात १५६७ दलघमी म्हणजे ४४.६५ टक्के, नागपूर विभागात १६२० दलघमी म्हणजे ३५.१८ टक्के, नाशिक ‍विभागात २१३८ दलघमी म्हणजे ३५.६२ टक्के तर पुणे विभागात ४३८१ दलघमी म्हणजे २८.८ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.

तसेच टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात १५५ गावांना आणि ४९९ वाड्यांना १०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ११७ गावे, १९९ वाड्यांना १०२ टँकर्स, पुणे विभागात ७१ गावे आणि ३६० वाड्यांना ७० टँकर्स, औरंगाबाद विभागात ४३ गावे, २३ वाड्यांना ५९ टँकर्स, अमरावती विभागात ६९ गावांना ६९ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकर्सची आवश्यकता भासलेली नाही.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरग्रस्त गावांमध्ये ५३ने आणि वाड्यांमध्ये ११६ ने वाढ झालेली आहे. तसेच टँकर्समध्ये ४६ ने वाढ झालेली आहे. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ४०१ टँकर्समध्ये ८९ शासकीय आणि ३१२ खासगी टँकर्सचा समावेश आहे.

हरभऱ्याची खरेदी २८ जूनपर्यंत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू

या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून ३२.८३ लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना ८.२० लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी २८ जून २०२२ पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम २९ मे २०२२ असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाला सांगितले.

सध्या हरभऱ्याचे बाजारभाव ४५००-४८०० रुपये प्रती क्विंटल आहे. गेल्या हंगामात हरभऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र २२.३१ लाख हेक्टर व एकूण उत्पादन २३.९७ लाख मे. टन इतके होते. सध्या सरासरी एकरी उत्पादन ११५८ क्विंटल प्रती हेक्टर असे आहे.

कोरोना वाढतोय, मास्क वापरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात १८.५२ टक्के ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे.

सध्या केवळ एक रुग्ण व्हेटिलेटरवर असून १८ रुग्ण ऑक्सिजनवर आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सध्या १८ पेक्षा अधिक वयाच्या ९२.२७ टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray important decision on sarthi land in cabinet meeting in mumbai pbs

Next Story
राज्यसभा निवडणूक; संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
फोटो गॅलरी