मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सध्या बैठक सुरू आहे. या बैठकीत समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात य़ेत आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक सुरू आहे.

आज आणि काल एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचारसह बरेच आरोप करण्यात आले आहेत. याचविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वानखेडे यांच्यावर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही गंभीर आरोप केले आहेत. खंडणी उकळण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही वानखेडेंवर कऱण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणावर राज्य सरकारची भूमिका काय असेल? हे जाणून घेण्यासाठी ही बैठक फार महत्त्वाची ठरणार आहे.

काय आरोप आहेत समीर वानखेडेंवर?

आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. प्रभाकर यांनी एक चित्रफीत प्रसारित केली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यानंतर क्रूझ पार्टीप्रकरणी गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले होते. आपल्या जीवाला धोका असल्यानं संरक्षण मागण्यासाठी पोलिसांकडे आल्याचं साईल यांनी म्हटले. दरम्यान, साईल यांच्या मागणीनंतर मुंबई पोलीस त्यांना संरक्षण देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.