बिजिंग महापालिका तर आमच्या हातात नाही, तिथेही पूर आलाय – मुख्यमंत्री

मुंबईप्रमाणेच जगभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीयेत, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

cm uddhav thackeray on mumbai flood
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील परिस्थितीवरून विरोधकांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना बसलेला पावसाचा जोरदार तडाखा असो किंवा मुंबईची पहिल्याच पावसानं झालेली तुंबई असो. या प्रकारामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. विशेषत: मुंबईत दरवर्षीच्या पावसामुळे साचणाऱ्या पाण्यामुळे आणि निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य स्थितीमुळे विरोधकांनी सरकारवर अनेकदा परखड शब्दांमध्ये टीका केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. मुंबईप्रमाणेच जगभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीयेत, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुंबईतील एच पश्चिम विभागामधील वॉर्ड ऑफिसच्या इमारतीत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पालिका अधिकाऱ्यांचा आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाविषयी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.

त्याला जबाबदार कोण?

“मुंबईवर नैसर्गिक आपत्ती यायच्या त्या येतच आहेत. सध्या एक नवीन संकट आहे. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस काही तासांत पडतोय. पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय. तिथे तर महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. बीजिंग किंवा जिथे कुठे जगभरात पूर आले, त्या महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. पण तिथेही पूर आले. आता त्याला जबाबदार कोण? हे तिथे कोण असतील ते बोलत असतील”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सामान्य मुंबईकरांसाठी लोकल कधी सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका!

“ज्या प्रमाणे ही पुराची आपत्ती आली, त्यावेळी स्थानिक प्रशासनाने ४ लाखांहून जास्त नागरिकांचं स्थलांतर केलं, म्हणून सुदैवाने मोठी प्राणहानी टळली. दुर्दैवाने काही प्रमाणात तिथे प्राणहानी झाली. चिपळूण, महाड, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी पूर आला. तिथे देखील मुंबई पालिकेने आपल्या टीम पाठवून तिथल्या नागरिकांना देखील मदत केली”, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“स्वत:चेच हसे करून घेतले”, भाजपाची टीका

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेली वास्तू १ मे पासूनच खुली झाली असून जुन्या वास्तूचं उद्घाटन केलं गेल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. “महापालिकेतील सत्ताधारी श्रेय घेण्याच्या नादात काय करुन दाखवतील याचा नेम नाही. मुख्यमंत्र्यांना या इमारती बाबत वास्तव माहिती न देता अशा प्रकारे कार्यक्रम करुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cm uddhav thackeray mocks bjp on flood situation in mumbai heavy rainfall pmw

ताज्या बातम्या