समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण हे मुंबईसाठी क्रांतिकारी पाऊल

२०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : मुंबईसाठी समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करणारा प्रकल्प सुरू करणे हे क्रांतिकारी पाऊल असून, आज आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे, असे प्रातिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.

जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नि:क्षारित करून मोठय़ा प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते परंतु त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. हे करत असताना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडे तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रूपाला येत आहे, २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईल, असे ठाकरे म्हणाले.

इस्रायलचे महावाणिज्य दूत याकोव फिनकेलस्टाईन यांनी ‘जल ही जीवन है..’ असे म्हणत आपल्या भाषणाची हिंदीत सुरुवात केली. त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सक्षमीकरण करण्याची गरज व्यक्त करताना इस्रायल भारतात सामंजस्य कराराद्वारे करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

* २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार करण्याची क्षमता.

* मे २०२२ पर्यंत प्रकल्प अहवाल तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा. याद्वारे मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी

* अनियमित-लहरी पाऊस, वातावरणीय बदल यामुळे मुंबईकरांना दरवर्षी १५ ते २० टक्के पाणीकपातीस सामोरे जावे लागते या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णपणे विश्वासार्ह जलस्रोतांचा विकास

* महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मनोरी, मालाड येथे उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रकल्पाची अंमलबजावणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी जागेत प्रकल्प उभारणी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cm uddhav thackeray praise mumbai desalination project by bmc zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या