गेल्या काही दिवसांपासून सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेनचा प्रवास कधी सुरू होणार? याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून देखील त्यासंदर्भात वारंवार मागणी केली जात असताना हे प्रकरण सध्या न्यायालयात देखील सुनावणीखाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार, यावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील एच-पश्चिम वॉर्डमधील वॉर्ड ऑफिसच्या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

लोकल कधी सुरु होणार? त्याच्यावर देखील विचार सुरू आहे. ज्या पद्धतीने आपण दुकानांना वगैरे शिथिलता दिल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकलचा निर्णय देखील जबाबदारीचं भान ठेऊनच घेणार आहोत. त्यासंदर्भात मी लवकरच तुमच्याशी संवाद साधीनच”, असं मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“मुंबई आणि इतर ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती संमिश्र स्वरूपाची आहे. अजूनही राज्यात करोनाची परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे, पण काही ठिकाणी चिंताजनक नसली तरी चिंता करायला लागू नये याची काळजी घेण्यासारखी आहे. जिथे आपण शिथिलता देऊ शकलो, तिथे दिली आहे. जिथे देऊ शकलो नाही, तिथे नाईलाज आहे. पण याचा अर्थ असा नाही की हे बंद म्हणजे कायमचं बंदच राहील”, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

उच्च न्यायालयाचे सरकारला सवाल!

दरम्यान, मुंबईत लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर देखील सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी, “बस आणि अन्य सार्वजनिक वाहनांतून गर्दीने प्रवास चालू शकतो. मग लोकलमधून का नाही. तिथे संसर्ग होणार नाही का?,” असा खडा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. तसेच, पत्रकारांना लोकलने प्रवास करण्यास मनाई असल्याचं माहिती पडलं, तेव्हा आश्चर्य वाटल्याचं देखील न्यायालयानं नमूद केलं आहे. यासंदर्भात पुढील गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयानं सरकारला दिले आहेत.

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधली का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला खडसावलं

कृपा करून संयम सोडू नका!

दरम्यान, यावेळी लॉकडाउनमध्ये शिथिलतेची मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. “आपण जिथे जिथे शिथिलता देऊ शकलेलो नाही, तिथल्या नागरिकांना आवाहन करतोय की कृपा करून संयम सोडू नका. असं काही नाही की कुणी आमचे शत्रू आहेत आणि कुणी आमचे लाडके आहेत. सगळ्या नागरिकांच्या जीवाची काळजी घेऊन निर्णय घ्यावे लागतात”, असं मुख्यमंत्री म्हणाले.