मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री असायला हवे होते. तसे झाले असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते, असे विधान महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे वृत्त आहे.

पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी शरद पवार हे अमरावतीला गेले होते. पशुपालन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्यासह यशोमती ठाकूर व इतर स्थानिक नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी आपल्या भाषणात यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर राज्याचे चित्र वेगळे असते. कोणी कितीही तीर मारले तरी पवार आपल्यासोबत आहेत म्हणूनच महाराष्ट्र स्थिर आहे, असे विधान यशोमती ठाकूर यांनी केले.

यशोमती ठाकूर यांच्या या विधानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे समजते. हे विधान म्हणजे एकप्रकारे आपल्यावरील सूचक भाष्य असून त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री व मुख्यमंत्र्यांमध्ये अंतर असल्याचा राजकीय संदेश जात असल्याची भावना आहे.

यशोमती ठाकूर यांच्या या विधानावर शिवसेनेतून नाराजीची प्रतिक्रिया उमटली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या संमतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत यशोमती ठाकूर काय म्हणतात याबद्दल वाद वाढवायचा नाही. पण शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव यशोमती ठाकूर यांनी द्यावा. त्यामुळे पूर्ण भारताला उपयोग होईल, देता का प्रस्ताव, असा टोला शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लगावला.

मुख्यमंत्रीपदाबाबतच्या विधानावरून वाद निर्माण झाल्याने आणि शिवसेनेतून प्रतिक्रिया उमटल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी त्यावर सारवासारव केली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्या्ंचे मार्गदर्शन महाराष्ट्राला कायमच हवे असते, असा माझ्या विधानाचा अर्थ होता, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.