मुंबई: करोनाची लाट आणि मानेच्या आजारामुळे गेली दोन वर्षे निवासस्थानातून राज्यकारभार पाहणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालयात येऊन प्रत्यक्ष कामकाज केले.  विविध विभागांत प्रत्यक्ष जाऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर, महत्त्वाकांक्षी तसेच  महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामाला वेग देण्याच्या सूचना देतानाच पेपरविरहित कामकाज आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून कारभार गतिमान करण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या. 

कोरनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षां’ निवासस्थान किंवा सह्याद्री अतिथीगृहातून कामाकाजास प्राधान्य दिले होते.  अपवाद फक्त रायगडमधील तळीये गावावर कोसळलेल्या संकटाच्यावेळी गेल्या वर्षी २३ जुलै रोजी मुख्यमंत्री काही काळासाठी मंत्रालयात आले होते.

मुख्यमंत्र्यांचा ताफा मंत्रालयात येताच त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना  अभिवादन केले. तसेच पुराभिलेख संचालनालयातर्फे त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रदर्शनाची पाहणी केली. प्रदर्शनातील बाबासाहेबांचा दस्तावेज तसेच पत्रे, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी करीत हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळी पण लावा अशी सूचना ठाकरे यांनी केली. सहाव्या मजल्यावरील दालनातून प्रत्यक्ष कामकाज केले.

कर्मचाऱ्यांशी चर्चा

मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील विविध विभागात जाऊन तेथील कामकाजाची पाहणी केली तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ठाकरे सामाजिक न्याय, महसूल, सामान्य प्रशासन, गृह, विधि व न्याय आदी विभागात फिरले. तसेच संकल्प कक्ष आणि मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षातील  कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. 

मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सूचनांमुळे उत्साह दुणावल्याची तसेच आमच्या विभागाला भेट देणारे मुख्यमंत्री ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री असावेत,  त्यांच्या भेटीने आम्हाचाही उत्साह वाढला आहे. त्यांनी पहिल्याच वर्षी जागतिक महिला दिन- ८ मार्च रोजी आम्हा सर्वाना आपुलकीने पत्र आणि फूल देऊन आश्चर्यचकित केले होते. त्यांची आजची भेटही अशीच आश्चर्यचकित करणारी असल्याच्या प्रतिक्रिय़ा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

भाजपची खोचक टीका

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षांनी मंत्रालयात आल्याने आता हत्तीवरून साखर वाटा, गुढय़ा-तोरणे उभारा, मंत्रालयात रांगोळय़ा घाला, अशी खोचक टीका मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी एखादा दिवस मंत्रालयात न येता आता नियमित यावे आणि जनतेसह लोकप्रतिनिधींनाही भेटून त्यांचे प्रश्न, अडचणी सोडवाव्यात. जनता दरबाराचेही आयोजन करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली. विधान परिषदेवरील बारा आमदारांच्या नियुक्त्यांचा विचार न करता राज्याचे बारा वाजविणाऱ्या वीज भारनियमनासह अन्य महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी तातडीने सोडवावेत, असे ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

गतिमान कारभारावर भर

राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्प कक्षाच्या माध्यमातून नियमित आढावा घेण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले. या योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वत: दर आठवडय़ाला आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   ठाकरे यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकल्प कक्षात जाऊन सागरी किनारा मार्गाच्या कामाचा आढावाही घेतला.  त्यावेळी या मार्गाचे ५२ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम सुरू आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत म्हणजे नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी दिली. यावर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकासाची पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे. यातील महत्त्वाच्या विषयांचा, कामांचा पाठपुरावाही संकल्प कक्षामार्फत घेतला जावा, अशा सूचनाही ठाकरे यांनी केल्या.