scorecardresearch

मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा : सीएमआरएसच्या चाचण्यांना अखेर सुरुवात ; लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार

नव्या वर्षात, जानेवारीत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा : सीएमआरएसच्या चाचण्यांना अखेर सुरुवात ; लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta photo

‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ मार्गिकांच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांनी सुरुवात केली आहे.  लवकरच या चाचण्या पूर्ण होतील आणि  सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर तात्काळ या मार्गिकांचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई : जॉन्सन कंपनीविरोधातील दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकत्रित घेण्याची मागणी

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दहिसर – आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला.  आता या दोन्ही मार्गिकांतील दुसरा टप्पा सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी – डी. एन. नगर आणि ‘मेट्रो ७’मधील आरे – अंधेरी पूर्व असा दुसरा टप्पा १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येईल, असे एमएमआरडीएने जाहीर केले होते. पण काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने हा मुहूर्त चुकला.  आता मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. तर दुसरीकडे हा टप्पा सुरू करण्याच्यादृष्टीने विविध चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनची (आरडीएसओ) चाचणी यापूर्वी पूर्ण करून एमएमआरडीएने त्यांच्याकडून प्रमाणपत्रही मिळवले आहे.

हेही वाचा >>>मुंबईः अंधेरीतील तरूणाची ५० लाखांची सायबर फसवणूक

या चाचणीनंतर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून चाचण्या करून घेत सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्याची शेवटची आणि महत्त्वाची प्रक्रिया शिल्लक होती. पण आता अखेर सीएमआरएसच्या चाचण्याला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सीएमआरएसचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. पथकाने चाचणीला सुरुवात केल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. या पथकाने बांधकामाबाबतच्या चाचण्यांना सुरुवात केली आहे. या चाचण्या पूर्ण होण्यास पुढील आठ/दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर तांत्रिक चाचण्या सुरू होतील. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्राच्या रूपाने हिरवा कंदिल दिला जाईल. दरम्यान, सीएमआरएस प्रमाणपत्र मिळवून नव्या वर्षात, जानेवारीत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:09 IST

संबंधित बातम्या