मुंबई : सीएनजीवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) १०.५ टक्क्यांनी कमी केल्याने सीएनजी उद्या, शुक्रवारपासून राज्यात किलोला सरासरी ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होणार आहे. सीएनजीवर १३.५ टक्के मूल्यवर्धित कर आकारण्यात येत होता. या करात दहा टक्के कपात करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. शुक्रवारपासून सीएनजीवर १३.५ टक्के ऐवजी तीन टक्के कर आकारला जाणार आहे. मूल्यवर्धित करात कपात केल्याने सीएनजीचा दर किलोला ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होईल, असे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले. प्रत्यक्ष सीएनजीची किंमत व करात होणारी कपात या आधारे प्रत्यक्ष किंमत शुक्रवारीच निश्चित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीएनजीवरील करात कपात केल्याने रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक वाहतूक, प्रवासी वाहतूकदारांना त्याचा फायदा होईल. सीएनजीच्या दरात वाढ होत असताना राज्य सरकारने करात कपात केल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.