मुंबई : मुंबईकरांना पुन्हा सीएनजी आणि घरगुती गॅस (पीएनजी-पाइप नॅचरल गॅस) दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात प्रति किलो चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत ३ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू असेल.

त्यामुळे सीएनजी प्रति किलो ८६ रुपये आणि पीएनजी प्रति किलो ५२ रुपये ५० पैसे दराने मिळणार आहे. स्थानिक पातळीवर गॅसपुरवठय़ात कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेतल्याचे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आले. याआधी मुंबईत सीएनजीची दरवाढ १३ जुलैला झाली होती. सीएनजीच्या दरात प्रति किलो चार रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात प्रति किलो तीन रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी १२ एप्रिल आणि नंतर २९ एप्रिलला वाढ होती.

सीएनजी दरवाढ सातत्याने होत असल्याने मुंबई महानगरात टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी भाडेवाढीचीही मागणी केली आहे.