देशात पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत राहिले. अवघ्या काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर अनुक्रमे चार रुपये आणि सात रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कधीच १०० पार गेलेल्या पेट्रोलनं आणि त्या बेतात असलेल्या डिझेलनं काहीशी उसंत घेतली. त्यामुळे सामान्यांनाही काहीसा दिलासा मिळाला. पण एकीकडे पेट्रोल-डिझेलवरील गाड्यांचे चालक दर कमी झाल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडत असतानाच आता सीएनजी आणि घरगुती वापरासाठी पाईपद्वारे पुरवण्यात येणारा नैसर्गिक वायू यांचे दर उंच भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा झालेली वाढ त्याचंच द्योतक मानलं जात आहे.

मुंबईत आज गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅसचे दर वाढले. आज सीएनजीच्या दरांमध्ये प्रतिकिलोमागे तब्बल ३ रुपये ९६ पैसे अर्थात जवळपास चार रुपये दर वाढले आहेत. त्यामुळे आता मुंबईत सीएनजीचे दर ६१ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत. त्यापाठोपाठ घरगुती वापरासाठी पाईपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या गॅसचे दर देखील प्रतियुनिट २ रुपये ५७ पैशांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे या गॅससाठी आता मुंबईतील घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ३६ रुपये ५० पैसे इतका दर मोजावा लागणार आहे.

वर्षभरात १४ रुपयांनी वाढले दर!

सीएनजीच्या दरांमध्ये गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा वाढ झाली असली, तरी या वर्षभरात म्हणजे साधारणपणे गेल्या १० महिन्यांमध्ये सीएनजीच्या दरांमध्ये तब्बल १४ रुपये प्रतिकिलो इतकी वाढ झाली आहे.

आता इलेक्ट्रिक कॅबकडे कल?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर देखील वाढू लागल्यामुळे अनेक टॅक्सीचालक हवालदील झाले आहेत. मुंबई टॅक्सीमन युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी याबाबत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, “२०२१मध्ये सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे आता अनेक चालक भविष्यात इलेक्ट्रिक कॅबचा पर्याय निवडण्याचा विचार करू लागले आहेत”.