मुंबई, ठाण्यात ‘सीएनजी’ तुटवडा; वाहनचालक, प्रवाशाची पंपांवर रखडपट्टी; रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सीचे प्रमाण कमी

जोडसुट्टय़ांमुळे अनेकांनी सहलींचे नियोजन केले असतानाच मुंबई महानगरातील अनेक पंपांवर अपुरा ‘सीएनजी’ पुरवठा झाल्याने शुक्रवारी टॅक्सी, रिक्षा कमी संख्येने धावत होत्या.

मुंबई, ठाण्यात ‘सीएनजी’ तुटवडा; वाहनचालक, प्रवाशाची पंपांवर रखडपट्टी; रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सीचे प्रमाण कमी
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : जोडसुट्टय़ांमुळे अनेकांनी सहलींचे नियोजन केले असतानाच मुंबई महानगरातील अनेक पंपांवर अपुरा ‘सीएनजी’ पुरवठा झाल्याने शुक्रवारी टॅक्सी, रिक्षा कमी संख्येने धावत होत्या. ‘सीएनजी’ भरण्यासाठी वाहनचालकांना पंपांवर तास-दीड तास रांगेत राहावे लागले.

‘सीएनजी’च्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे मुंबई महानगराच्या हद्दीतील अनेक पंप शुक्रवारी बंद होते. तर अन्य पंपांवर वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या. इंधन नसल्याने काही टॅक्सी, रिक्षा दिवसभरासाठी बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांचीही अडचण झाली. जोडसुट्टय़ांमुळे अनेकांनी सहलींचे नियोजन केले आहे. ‘सीएनजी’ टंचाईमुळे यापैकी काहींच्या उत्साहावर विरजण पडले.

सीएनजीचे पंप वाढवले जाणार : महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)चे मुंबईत साधारण २९५ सीएनजी पंप आहेत. मात्र, या पंपांवर वाहनधारकांच्या कायम रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे अर्धा ते एक तास रांगेत उभे राहून सीएनजी भरावा लागतो. यासाठी आता एमजीएलकडून सीएनजी पंप वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी जागांचा शोध घेतला जात आहे. सीएनजी पंपावरील प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात येत आहेत, असे एमजीएलकडून सांगण्यात आले.

ल्ल सणासुदीच्या वेळी मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ असून सीएनजीच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाली. मर्यादित सीएनजी असल्याने अनेक ठिकाणी कमी दाबाने तो भरला जात होता. त्यामुळे अधिक मागणी असताना तेवढा पुरवठा करण्यासाठी पुरवठा वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत, अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडने दिली.

ठाण्यात वाहनांच्या रांगा..

ठाणे : शहरातील एका ‘सीएनजी’ पंपावरील पुरवठा यंत्रणेत गुरुवारी उशिरा रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने या पंपावर ‘सीएनजी’साठी वाहनांच्या रांगा लागल्या. हा बिघाड शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास दुरुस्त करण्यात आला.

 पंपावरील ‘सीएनजी’ पुरवठा खंडित झाल्याने पहाटे ‘सीएनजी’ भरण्यासाठी आलेल्या रिक्षाचालकांची गैरसोय झाली. अनेक जण घरी निघून गेले. त्यामुळे शहरात रिक्षाही कमी धावल्या. दरम्यान, शुक्रवारी रात्री ११ नंतर सीएनजी पुरवठा पूर्ण बंद झाला. तीन दिवस सुट्टय़ा असल्याने जिल्ह्याबाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या मोटार मालकांचीही गैरसोय झाली.

काही पंपावर कमी दाबाने सीएनजी पुरवठा होत आहे, तर काही सीएनजी पंप बंद असल्याने अनेक चालकांना टॅक्सी, रिक्षा वाहतूक बंद करावी लागली. त्याचा प्रवाशांना फटका बसला. मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा, भायखळा येथील सीएनजी पंपांवर टॅक्सींच्या रांगा वाढल्याने पोलिसांनी टॅक्सीचालकांना हुसकावण्याचे प्रकारही घडले. 

– ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

सीएनजी पंपांवर कमी दाबाने पुरवठा होत असल्याने पंपांवर वाहनचालकांचा अधिक वेळ जातो. अन्य समस्याही आहेत. महानगर गॅस लिमिटेडने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

– शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cng shortage driver passenger pumps rickshaw taxis roads ysh

Next Story
अधिक भाडे घेणे टॅक्सीचालकांना महागात; ताडदेव ‘आरटीओ’कडून प्रवाशांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक 
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी