राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जयपूरमधील हॉटेलमध्ये बैठक झाली. यामध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.
सोनिया गांधी या शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्याकरिता तयार नसल्या तरी काँग्रेस आमदारांचा दबाव वाढला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे. यात पुढील सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होणार आहे.
तेराव्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपाची सरकार स्थापन्याची तयारी आहे का, अशी विचारणा करणारे पत्र शनिवारी राज्यपालांनी पक्षाला पाठवले आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर राजकीय हलचालींना चांगलाच वेग आला आहे. भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागेल.
दरम्यान, विधानसभेतील सदस्यसंख्येचा आढावा घेतल्यास भाजप १०५ आणि शिवसेना ५६ असे १६१ संख्याबळ होते; पण उभयतांमध्ये सध्या तरी बिनसले. दुसरा पर्याय हा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असा असू शकतो. या तिघांचे संख्याबळ १५४ होते; पण काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर जाण्यास तयार नाही. काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकार दिल्यास शिवसेना व राष्ट्रवादीचे संख्याबळ होत नाही. तिसरा पर्याय हा भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा. तसे झाल्यास १५९ संख्याबळ होते
