सुरक्षेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपाययोजना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवासादरम्यान महिलांशी संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लोकलच्या महिला डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला होता. आतापर्यंत ३२३ महिला डब्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पुढील एका वर्षात सर्वचं महिला डब्यांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रवासादरम्यान महिलांवर होणारे हल्ले, करण्यात येणारी छेडछाड, विनयभंग आदी घटना घडत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी लोकलमधील महिला डब्यांत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. प्रथम पश्चिम रेल्वेने २०१५ साली महिलांच्या डब्यांत कॅमेरे बसवण्यास सुरूवात केली. त्यानंतर मध्य रेल्वेनेही हा प्रकल्प राबविला. बारा डब्यांच्या एका लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणीचे तीन डबे आणि प्रथम श्रेणीचे तीन छोटे डबे असतात. यातील प्रत्येक डब्यात एक ते दोन कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले. मध्य रेल्वेवरील १५६ लोकलच्या महिला डब्यांत एकूण ७४४ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे.

आतापर्यंत मध्य रेल्वेवरील लोकलच्या १८३ महिला डब्यांत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुढील वर्षभरात ५८९ महिला डब्यांत कॅमेरे बसविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. तर पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील सुमारे ४१ लोकलमधील १४० महिला डब्यांत कॅमेरे बसविण्यात आले असून येत्या वर्षभरात उर्वरित लोकलमधील महिलांच्या डब्यांत कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर १९९० साली ६९ लोकल गाड्या होत्या आणि दिवसाला १,०२३ लोकल फेऱ्या होत होत्या. २०१० मध्ये लोकल गाड्यांची संख्या १११ झाली आणि फेऱ्या १,४६२ झाल्या. तर २०१८ पासून १३४ लोकल गाड्या ताफ्यात असून दिवसाला १,७७४ फेऱ्या होऊ लागल्या. आता लोकलची संख्या १५६ वर पोहोचली आहे. तर फेऱ्यांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे डब्यांची संख्याही वाढली आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम रेल्वेवरीलही लोकलच्या संख्येतही वाढ झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coaches women locol cctv cameras central western railway measures for safety mumbai print news amy
First published on: 21-06-2022 at 11:04 IST