मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे काम पूर्ण होत आलेले असताना आता एक नवीन पेच निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी समुद्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून जमीन तयार करण्यात आली आहे. मात्र या भराव जमिनीपैकी ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळचा भाग प्रकल्पासाठी देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भराव घातलेली ही जमीन ब्रीच कॅण्डी रुग्णालयाला मिळणार आहे. मात्र ही जमीन ब्रीच कँडी रुग्णालयाला देण्यास पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे.

भराव घातलेली जमीन ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक जागा असून या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे ही जमीन कोणालाही देण्यास विरोध असल्याचे पत्र पर्यावरणवाद्यांनी पालिका प्रशासनाला पाठवले आहे.

याबाबत सागरी किनारा मार्गाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सागरी किनारा मार्गासाठी समुद्रात भराव घालण्यात आलेला आहे. हा भराव घालताना पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारितील भूभाग प्रकल्पासाठी मागितले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने बहुतांशी भूभाग दिलेही होते. मात्र त्यापैकी ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळचा भूभाग हा समुद्राखाली होता. त्यावर भराव टाकून तो देखील प्रकल्पाचा भाग असल्याचे गृहित धरण्यात आले होते. त्यामुळे भराव घातलेला हा भूभाग कास्टिंग यार्ड म्हणून वापरला जात होता. मात्र त्यानंतर हा भूभाग ब्रीच कॅण्डी रुग्णालयाला मक्त्याने दिला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिका प्रशासनाने २०२१ मध्ये कळवले होते. परंतु, हा भूभाग प्रकल्पासाठी द्यावा, अशी विनंती पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला केली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने ही विनंती अमान्य केली. त्यामुळे अखेर हा भूभाग प्रकल्पातून वगळावा लागणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने हा भूभाग ५० वर्षांच्या मक्त्याने रुग्णालयाला दिला होता. मात्र हा भाग गेल्या काही वर्षांत समुद्राखाली गेला होता. सागरी किनारा मार्गासाठी भराव घालताना भरती रेषेपर्यंत भराव घालण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला आता आयता भूभाग मिळू शकणार आहे. दरम्यान, पर्यावरणवादी झोरू भतेना आणि स्टॅलिन डी यांनी याला विरोध केला आहे. सागरी किनारा मार्गासाठी भराव घातलेल्या जमिनीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणतेही बांधकाम करता येणार नाही, तसेच ही जमीन सर्वसामान्यांच्या वापरासाठीच वापरली जावी, असे असल्यामुळे ही जमीन देता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसे पत्र पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवले आहे.

सहा हजार चौ. मी. जागा

सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील भरावभूमीपैकी सहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन ब्रीच कॅण्डी रुग्णालय प्रशासनाला मिळणार आहे. समुद्रालगत असलेली ही जमीन जिल्हाधिकारी कार्यालयाने रुग्णालयाला मक्ताकराराने दिली होती. मात्र सागरी किनारा मार्गासाठी भराव टाकून झाल्यानंतर आता ही बाब उघडकीस आली. त्यामुळे मुंबई महापालिकेला ही जमीन ब्रीच कॅण्डी रुग्णालय प्रशासनासाठी सोडावी लागणार आहे.

ही जमीन पालिका प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाला दिलेली नाही. ती सरकारच्या मालकीची जमीन असून जिल्हाधिकारी कार्यालयानेच ती जमीन रुग्णालय प्रशासनाला आधीच दिली आहे. ही जमीन प्रकल्पासाठी द्यावी अशी विनंतीही आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती.   – भूषण गगराणी, मुंबई महापालिका आयुक्त

Story img Loader