मुंबई – मरीन ड्राईव्ह येथील साडेतीन किमी लांबीच्या समुद्री पदपथापेक्षाही लांब असा समुद्री पदपथ सागरी किनारा महामार्गाला लागूनच तयार होतो आहे. ‘प्रियदर्शनी पार्क’ ते वरळी दरम्यान हा ७.५ किमीचा विस्तीर्ण पदपथ तयार होतो आहे. या समुद्री पदपथाचा काही भाग जुलै महिन्यात सुरु होणार आहे.
श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’च्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किमी लांबीचा सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) मुंबई महानगरपालिकेने तयार केला आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे या मार्गाचे नाव आहे. या मार्गालगत मरीन ड्राईव्ह प्रमाणेच समुद्री पदपथ (प्रोमेनेड) तयार करण्यात आला आहे. हा मुंबईतील सर्वात मोठा समुद्री पदपथ असून त्याची लांबी ७. ५ किमी आहे. यापैकी प्रियदर्शीनी पार्क ते हाजीअली आणि बडोदा पॅलेस ते वरळी या भागातील समुद्री पदपथ जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत सुरु होणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.
सागरी किनारा मार्ग वाहनांसाठी पूर्ण क्षमतेने सुरु झाला आहे. या सागरी किनारा मार्गाच्या बरोबरीने समांतर जाणारा समुद्री पदपथही तयार होतो आहे. या पदपथापैकी ७० ते ८० टक्के भाग लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. प्रियदर्शीनी उद्यान ते हाजीअली हा भाग आणि बडोदा पॅलेस ते वरळी पर्यंतचा विस्तीर्ण समुद्री पदपथ लवकरच खुला होणार आहे. हाजी आली येथे भूमिगत मार्गातून बाहेर येऊन पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावर येता येणार आहे.
सागरी किनारा मार्गावर समांतर बोगद्याचे जसे आकर्षण आहे. तसेच समुद्री पदपथ हे यां प्रकल्पाचे आणखी एक आकर्षण आहे. या पदपथावर मरीन ड्राइव्ह प्रमाणेच बसण्यासाठी दगडाची सलग व्यवस्था असेल. भरतीच्या लाटांपासून संरक्षणासाठी या समुद्री पदपथाला लागून सागरी भिंत (सी वॉल) बांधण्यात आली आहे. ही समुद्री भिंत उभारण्यासाठी नवी मुंबईच्या उलवे येथील खाणीतून आर्मर रॉक हे नैसर्गिक दगड वापरण्यात आले आहेत. एका दगाचे वजन एक ते तीन टन इतके असून प्रचंड वेगाने धडकणाऱ्या लाटा पेलण्याची क्षमता या दगडांमध्ये आहे. मरीन ड्राईव्ह येथे असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या टेट्रापॉड च्या ऐवजी हे दगड वापरण्यात आलेले आहेत. टेट्रापॉडमध्ये सागरी जीवसृष्टी विकसित होत नाही, मात्र आरमार रॉक हे नैसर्गिक असल्यामुळे सागरी जीवसृष्टी प्रवाळ यांच्यासाठीही ते सुरक्षित आहेत.
मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ
मुंबईत सध्या नेताजी सुभाष मार्गालगत असणारा मरीन ड्राईव्ह हा साडे तीन किमी लांबीचा सर्वात लांब समुद्री पदपथ आहे. मात्र सागरी किनारा मार्गालगत होणारा नवीन समुद्री पदपथ हा त्याच्या दुपटीपेक्षा अधिक लांबीचा म्हणजेच ७.५ किमी लांबीचा आहे. या पदपथाची रुंदी २० मीटर आहे. या पदपथालगत सुशोभिकरणासाठी देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना बसण्यासाठी कट्ट्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे.