मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) वाहनचालकांसाठी आगळावेगळा अनुभव देणारा म्युझिकल रोड (संगीत मार्ग) आसपासच्या स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखी बनला आहे.
गाड्यांच्या सततच्या वर्दळीमुळे दिवसातून शेकडो वेळा नागरिकांच्या कानी कर्कश आवाज पडत असून रात्रीच्या झोपेवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे संबंधित उपक्रम बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत म्युसिकल रोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर संगीत रस्ता तयार करण्यात आला आहे. या संगीत मार्गावरील (मेलोडी रोड) पट्ट्यांवरून ठराविक वेगाने वाहन चालविल्यास ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकू येते. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे.
वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास ‘जय हो’ या गीताची धून ऐकू येते. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींवर ‘जय हो’ गाण्याची धून बसविण्यात आली आहे.
दिवसभरात या मार्गावरून हजारो गाड्यांची वाहतूक होते. परिणामी, आसपासच्या स्थानिकांना नाईलाजाने हजारो वेळा ‘जय हो’ची धून ऐकावी लागते. रात्रीच्या वेळी गाड्यांची वर्दळ सुरूच असते. परिणामी, नागरिकांना निद्रानाशाचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत सातत्याने स्थानिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. ब्रीच कँडी सिटीझन फोरमनेही महापालिकेकडे तक्रार केली. त्यानुसार रात्री १० नंतर संगीत रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत संगीत रस्त्याच्या बाजूने रस्ता रोधक (बॅरिकेडिंग) उभारण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
भारतातील पहिलाच प्रयोग
या अभिनव संकल्पनेचा प्रसार २००७ मध्ये जपानमध्ये झाला. जपानमधील अभियंता शिझुओ शिनोडा यांनी बुलडोझरच्या साहाय्याने रस्त्यावर काम करताना हा ध्वनी परिणाम शोधून काढला. पुढे याच प्रयोगातून ‘मेलडी रोड’ ही संकल्पना विकसित झाली. आतापर्यंत हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती येथे असे प्रयोग करण्यात आले आहेत. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.
