मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत असलेल्या सागरी किनारा मार्गाचे काम पूर्णत्वास आले असले तरी या कामाच्या खर्चात वाढ करण्याचे प्रस्ताव वारंवार स्थायी समितीसमोर येत आहेत. या प्रकल्पाच्या खर्चामध्ये सातवेळा बदल करण्यात आला असून प्रकल्पाचा एकूण खर्च आता १२ हजार कोटींवरून १४ हजार कोटींच्या पुढे गेला आहे.

मुंबई महापालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होऊन वर्ष उलटले. तरी या कामासाठी अजूनही लहान लहान खर्चाचे फेरफार प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येत आहेत. येत्या स्थायी समिती बैठकीसमोर पुन्हा एकदा खर्चातील वाढीसंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी आला आहे.

खर्च का वाढला?

एकूण सागरी किनारा रस्त्यापैकी काही भागात समुद्र भिंत बांधण्याच्या कामामुळे खर्च वाढला आहे. तर मरीन ड्राईव्ह येथील विहार पदपथाचा विस्तार, पारसी स्तंभाची पुनर्स्थापना, विहारपथावरील बैठक व्यवस्थेची तरतूद या कामासाठी यावेळी ५९ कोटी ८५ लाखांचा खर्च वाढलेला आहे. आतापर्यंतची ही खर्चातील सातवी वाढ आहे. सातव्यांदा फेरफार केल्यानंतर प्रकल्पाची किंमत १४,९७७ कोटींवर गेली आहे. प्रकल्पाचा मूळ खर्च १२ हजार ७२१ कोटी होता.

दरम्यान, यावेळी प्रशासनाने जी वाढ केली आहे त्याची कारणे देताना म्हटले आहे की, प्रकल्पात गिरगाव चौपाटीकडे जाणार्या रस्त्यासाठी आधी दोन मार्गिका होत्या त्या वाढवून नंतर तीन मार्गिका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विहार पदपथ समुद्राच्या दिशेने सरकवावा लागला. त्यामुळे भराव व समुद्र भिंत व रस्त्याच्या कामाचा खर्च वाढला. तसेच या ठिकाणी असलेल्या पारशी स्तंभाची पुनर्स्थापना करावी लागल्यामुळेही खर्चात वाढ झाल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.

हिशोब आकडेवारीत…

  • प्रकल्पाच्या मूळ खर्चात वस्तू व सेवा करामुळे झालेली वाढ – ३३९ कोटी
  • जलवाहतूकीसाठी पुलाच्या दोन खाबांमधील अंतर वाढवल्यामुळे – ९२२ कोटी
  • नवीन टेट्रापॉड बसवण्याच्या कामामुळे झालेली वाढ – ४६ कोटी
  • हाजीअली येथे वाहनतळ बांधण्याच्या कामासाठी – ७४९ कोटी
  • बोगद्यातील वायूविजन प्रणालीतील बदलांमुळे प्रकल्प खर्चात वाढ – ३० कोटी
  • आराखड्यातील बदलामुळे झालेली वाढ – १०७ कोटी
  • रस्त्याच्या कामातील फेरफारामुळे झालेली वाढ – ५९ कोटी
  • प्रकल्पाचा मूळ खर्च – १२,७२१ कोटी
  • सातव्यांदा खर्चात वाढ केल्यानंतर प्रकल्पाचा खर्च – १४,९७७ कोटी