मुंबई : सुटी नाणी जमा करण्याबाबत एका बँकेसोबतचा करार संपुष्टात आल्याने आणि नव्या बँकेसोबतचा करार अद्यापही न झाल्याने प्रवाशांकडून प्रवासादरम्यान मिळणारी नाणी मोठय़ा प्रमाणात बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत जमा होत आहेत. दररोज कोटींमध्ये सुटी नाणी बेस्टकडे जमा होत असून एवढय़ा नाण्यांचे करणार काय, असा प्रश्न बेस्टसमोर निर्माण झाला आहे. यावर तोडगा म्हणून एक ते दहा रुपयांची नाणी व्यापारी, सामान्यांना उच्च मूल्य वर्गाच्या बदल्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रमाने जून २०१९ मध्ये किमान भाडेदरात कपात केली. त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्यांकडून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये आणि वातानुकूलित बससाठी सहा रुपये भाडे आकारण्यास सुरुवात झाली. भाडे कपात होताच प्रवाशांना बेस्टचा प्रवास परवडू लागला आणि प्रवासी संख्या वाढू लागली. तेव्हापासून उपक्रमाच्या तिजोरीत मोठय़ा प्रमाणात सुटी नाणी जमू लागली. एवढी नाणी मार्गी लावण्यासाठी एका बँकेशी करार करण्यात आला आणि ही नाणी बँकेने बेस्टच्या आगारातून जमा करण्यास सुरुवात केली. या बँकेसोबतचा करार संपुष्टात आल्याने आता पुन्हा मोठय़ा प्रमाणावर सुटी नाणी जमत आहेत. प्रवाशांना प्रवासात सुट्टे पैसे देऊनही पुन्हा बेस्टच्या तिजोरीत एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये आणि दहा रुपयांची नाणी जमा होत आहेत. एका बँकेशी असलेला करार संपुष्टात आल्यानंतर आता नव्याने दुसऱ्या बँकेसोबत लवकरच करार करण्यात येणार आहे. त्यानंतर सुटी नाणी पुन्हा बँकेकडे जमा करण्यात येतील.

बेस्ट उपक्रमाकडे सध्या १० व २० रुपये मूल्यवर्गाच्या नोटांबरोबरच एक ते १० रुपयांपर्यंतची नाणीही मोठय़ा प्रमाणावर जमा असून ती नागरिक, व्यापारी आणि समाजातील इतर तत्सम घटकांना उच्च मूल्य वर्गाच्या बदल्यात उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. बेस्टच्या सर्व बस आगारांत तिकीट व रोख विभागात रविवार आणि सार्वजनिक सुट्टी सोडून अन्य दिवशी सकाळी ९.३० ते दुपारी ४ पर्यंत सुटी नाणी, नोटा वितरित करण्याची व्यवस्था केल्याचे उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय बेस्ट कर्मचाऱ्यांनाही वेतन देताना काही रोख रक्कम सुटय़ा नाण्यांच्या रूपात दिली जाते.