मुंबई : कुलाब्यातील सबिना चंद्रशेखर मैदान (बॅक गार्डन) सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे. सुशोभीकरणाच्या नावावर मैदानाची रचना बदलण्याचा घाट प्रशासनाने घातल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असतानाच आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही या फुटबॉल मैदानाच्या वादात उडी घेतली आहे. महापालिका प्रशासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व कुटुंबियांच्या दबावाखाली काम करत असून बॅक गार्डनमध्ये काँक्रीटचे जंगल उभारण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप आदित्य यांनी केला आहे. तसेच, मुंबईतील सर्व खेळाच्या मैदानांचे लेखापरीक्षण करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कुलाबा येथे फुटबॉल खेळाडूंसाठी कूपरेज आणि सबिना चंद्रशेखर (बॅक गार्डन) ही दोनच मैदाने आहेत. कूपरेज मैदानात सर्वसामान्यांना प्रवेश बंदी असून तेथे क्लबचे खेळाडू खेळण्यासाठी येतात. त्यामुळे सर्वसामान्य खेळाडूंना केवळ सबिना चंद्रशेखर मैदानात खेळता येते. मैदानाची देखभाल करणाऱ्या संस्थेला महापालिका प्रशासनाने नुकतीच सुशोभीकरणाची परवानगी दिली असून त्याअंतर्गत उद्यानातील नैसर्गिक गवत काढून कृत्रिम गवत लावण्यात येणार आहे. तसेच, तेथे धावपट्टी तयार करण्याचाही संस्थेचा मानस आहे.

मात्र, मैदानात संरचनात्मक बदल करण्यास स्थानिक व खेळाडूंकडून विरोध केला जात आहे. नागरिकांचा विरोध डावलून मैदानात शुक्रवारी बांधकाम झाल्यांनतर नागरिकांनी राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच, काही वेळातच ते बांधकाम रोखण्यात आले. महापालिका आयुक्तांनाही नागरिकांनी घेराव घालून जाब विचारला. मात्र, त्यांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनतर आता आदित्य ठाकरे यांनीही महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून याप्रकरणी भूमिका मांडली.

सुमारे दशकभरापूर्वी आम्ही कुलाब्यातील बॅक गार्डनमध्ये जलतरण तलाव उभारण्याच्या प्रस्तावाला विरोध करून ते मैदान वाचवले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक व शाळांना या मैदानाचा वापर करता येत आहे. मात्र, आता पुन्हा महानगरपालिका प्रशासन सभापती आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दबावाखाली हे खेळाचे मैदान काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित करण्याचा आणि प्रवेशावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. बॅक गार्डन जसे आहे तसेच ठेवावे. त्यात बदल करू नये. व्यावसायिक कारणांसाठी टर्फमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या खासगी संस्थांच्या ताब्यातील सर्व मैदानांचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.