मुंबई : कुलाबा कोळीवाड्यातील शेकडो वर्षे जुन्या मंदिरातील मूर्तींवर असलेला चांदीच्या चार मुखवट्यांची आज दुपारच्या सुमारास चोरी झाल्यामुळे खळबळ माजली आहे. सव्वा दोन किलो वजनाचे चार मुखवटे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. असा चोरीचा प्रकार पहिल्यांदाच घडल्यामुळे कोळी समाज हादरला आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तात्काळ तपास सुरु केला आहे. 

सात बेटांपासून तयार झालेल्या मुंबईतील कुलाबा कोळीवाड्यात ‘कुलाबा जमात ट्रस्ट मंदिर’ याच्या मालकीचे हे मंदिर आहे. या मंदिरात खंडोबा-म्हणाल्या देवी, भैरीदेवी, गावदेवी आणि एकवीरा देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या मूर्तींवर खास चांदीचे मुखवटे तयार करुन घेण्यात आले होते. मंदिराचेया जिर्णोद्धारासाठी सुमारे दहा ते १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

हे मंदिर दुपारी एक ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत बंद असते. या काळात मंदिरातील काचेचा दरवाजा फक्त कडी लावून बंद केला जातो. याच काळात साधारणत: तीन ते पाच या वेळेत चोरट्यांनी डाव साधला असावा, असा स्थानिकांचा अंदाज आहे. काही नागरिकांनी तीन वाजेपर्यंत मुखवटे असल्याचे पाहिले होते. चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेची वायर कापण्यात आली होती तसेच सीपी युनिट चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.  

कुलाबा कोळीवाड्यातील हे सर्वांत जुने मंदिर आहे. दोन जमातीतील वादामुळे आता गावात दोन मंदिर आहेत. गावातील पाटलांचे मंदिर स्वतंत्र आहे तर तेथीलच साईदरबारात काहींनी मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. या मंदिरातील खंडोबा पालखी उत्सव प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्यातून कोळीबांधव येतात, असे स्थानिक रहिवासी गोरक्षनाथ कोळी यांनी सांगितले.

या प्रकरणी एका इसमावर पोलिसांचा संशय असून मुखवट्यांच्या शोधासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. आरोपी लवकरच पकडला जाईल, असे कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विविध भागांत मंदिरांना लक्ष्य करून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, वाशिम अशा ठिकाणी चांदीचे मुखवटे, दानपेटीतील रक्कम आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अलीकडे लालबाग जैन मंदिरातील पावणे दोन कोटींचे दागिने चोरीला गेले होते. पोलिसांनी आरोपीला २४ तासांत जेरबंद केले.

राज्यातील मंदिरात झालेल्या चोऱ्या  

सिद्धिविनायक मंदिर (मुंबई) : दादर येथील सिद्धिविनायक मंदिराच्या पुजारी कक्षातील दानपेटीतून अंदाजे दहा हजार रुपयांची चोरी, एका कर्मचाऱ्याला अटक. पुणे – चिंचवड जैन मंदिर: पुजारी बनून आलेल्या चोराने भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला, ४८ तासांत अटक. वाशिम – गावठाण (मनोरा): येथील श्री अंबिका माता मंदिरात चोरी, चोरटे दुचाकीवरून आले होते. मंठा – रामेश्वराय महादेव मंदिर: सुगंधा नगर भागातील मंदिरात रात्री चोरी, सीसीटीव्हीत घटना कैद. पिंपरी-चिंचवड: वडमुखवाडीतील महादेव मंदिरात चोराने पिंडीचे दर्शन घेऊन दानपेटी लंपास केली. हिंजवडी : हनुमान मंदिरातून दानपेटीची चोरी.