मुंबई : ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कुलाबा येथील प्रसिद्ध ऑलिम्पिया कॉफी हाऊसवर कारवाई केली असून आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. एफडीएच्या तपासणीदरम्यान आस्थापनेतील अन्न साठवणूक कक्षातच स्वच्छतागृह असल्याचे आढळून आले. तसेच अन्न शिजवण्याची जागा आणि भांडी धुण्याची जागा येथे अस्वच्छता आढळली. अन्नपदार्थ जमिनीवर,अस्वच्छ पाण्याचा वापर, झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव यामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

रेफ्रिजरेटरमध्ये मांसजन्य रक्ताचे अवशेष आढळून आले. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे योग्य प्रकारे विभाजन केले जात नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. खराब झालेल्या कटिंग बोर्डचा वापर होत असल्याचे आढळले. अन्न हाताळणारे कर्मचारीही आवश्यक संरक्षक पोशाख वापरत नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

तपासणीदरम्यान आस्थापनेतील ३५ अन्न हाताळणाऱ्यांपैकी तब्बल ३४ जणांकडे आवश्यक अन्न सुरक्षा प्रशिक्षण नसल्याचे आढळले. तसेच पाणी तपासणी अहवाल आणि आवश्यक स्वच्छता नोंदी उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले.अन्नसुरक्षेच्या या गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने ऑलिम्पिया कॉफी हाऊसचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. निलंबनाच्या कालावधीत आस्थापनेला अन्नपदार्थांची खरेदी, तयार करणे, साठवणूक तसेच विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. आस्थापनेतील सर्व त्रुटींची पूर्णतः दुरुस्ती करून त्यानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.

नायर रुग्णालयातील उपहारगृहावरही कारवाई

नायर रुग्णालयातील उपहारगृहाची बुधवारी एफडीएमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान उपहारगृहात अन्न सुरक्षा व स्वच्छता मानकांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. रुग्ण व नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करून उपहारगृहाचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे.