मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धी कृपा मंडळाने यंदा तब्बल १ लाख ११ हजार रुद्राक्षांपासून गणेशमुर्ती साकारली आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी विविध वस्तूंचा वापर करून त्यापासून गणेशमूर्ती साकारण्याची पद्धत दक्षिण मुंबईत होती. तीच परंपरा या मंडळाने परत आणली असून ‘कुलाबा सम्राट’ची यंदाची मूर्ती रुद्राक्षांचा वापर करून घडवण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील अनेक गणपती मंडळांमध्ये विविध वस्तू, पदार्थांपासून गणेशमुर्ती साकारल्या जात होत्या. केळ्यांचे घड, गरम मसाल्याचे पदार्थ, चॉकलेट अशा विविध खाद्यपदार्थांपासून ते अगदी निर्जीव वस्तूमधूनही गणेशमूर्ती साकारल्या जात असत. उंच मूर्तीच्या स्पर्धेत ही कला जवळपास मागे पडली होती. मात्र, कुलाब्यातील श्री सिद्धी कृपा मंडळाने रुद्राक्षांपासून गणेशमूर्ती साकारली असून २० वर्षांपूर्वीचा हा गणेशमूर्तीमधील परंपरा पुन्हा रूढ होत आहे.

कुलाब्याच्या या मंडळाच्या मूर्तीच्या आगमन मिरवणुकीतील छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रचंड फिरत असून रुद्राक्षांनी सजलेली ही अनोखी गणेशमूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे. रुद्राक्षांच्या गणेशमूर्तीची संकल्पना मंडळाने प्रथम २००४ मध्ये राबवली होती. एका छायाचित्रात रुद्राक्षांपासून साकारलेला गणपती पाहिल्यानंतर मंडळाने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यानंतर विष्णू, विठ्ठल व कृष्ण अशा विविध देवतांच्या रुद्राक्षमूर्तीही मंडळाने साकारल्या.

यंदा मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी पुन्हा रुद्राक्षांचा गणपती साकारण्याचा प्रस्ताव मांडला अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी विनोद शेंडगे यांनी दिली. २००४ मध्ये ही मूर्ती साकारण्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीतील कार्यकर्त्यांनी ही कलाकृती घडवली असल्याचेही त्यांनी सांगितले. १९६४ मध्ये स्थापना झालेल्या या मंडळाला सहा दशकांहून अधिक काळाची परंपरा आहे. हे मंडळ ‘कुलाबा सम्राट’ या नावाने मुंबईत प्रसिद्ध आहे.

एक लाख रुद्राक्ष या गणेशमूर्तीसाठी लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांसह चार वेगवेगळ्या आकारांचे एकूण १ लाख ११ हजार रुद्राक्ष वापरण्यात आले आहेत. मूर्तीचा चेहरा, उदर, हस्त, सोंड व डोळे अशा प्रत्येक भागासाठी योग्य आकाराचे रुद्राक्ष निवडून ते मूळ पीओपीच्या मूर्तीवर चिकटवण्यात आले आहेत. या संपूर्ण कामासाठी बाहेरील मूर्तिकाराची मदत न घेता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः मेहनत घेतली, असेही शेंडगे यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्याचा मानस

पीओपीच्या वापराबाबत बोलताना मंडळाच्या प्रतिनिधींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी भविष्यात अधिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. कागदाचा लगदा व शाडूचा वापर करून पूर्णपणे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा मंडळाचा मानस आहे. मात्र, यंदाच्या रुद्राक्षांच्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात क्रेनच्या साह्याने करण्यात येणार आहे. रुद्राक्ष नैसर्गिक असल्याने विसर्जनानंतर त्यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.