मुंबई : दक्षिण मुंबईतील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितील कुलाबा संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५२५ पैकी ३३५ गाळ्यांचा पुनर्विकास पूर्ण करण्यात आला. मात्र उर्वरित १०९ गाळ्यांचा पुनर्विकास करून तिथे २२ मजली इमारती बांधण्यात येणार होत्या, तर यातून मुंबई मंडळाला मोठ्या संख्येने सोडतीसाठी अतिरिक्त घरे उपलब्ध होणार होती. मात्र संरक्षण विभागाच्या उंचीच्या मर्यादेच्या नियमामुळे कुलाबा संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करून त्याअंतर्गत २२ मजली इमारती उभारण्याचा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. परिणामी, येथील पुनर्विकास अर्धवट राहिला आहे.

उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरतासाठी दुरूस्ती मंडळाकडून मुंबईत विविध ठिकाणी संक्रमण शिबिरे बांधण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश संक्रमण शिबिरे जीर्ण झाली आहे. त्यामुळे संक्रमण शिबिराचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. जीर्ण झालेल्या कुलाबा संक्रमण शिबिराचा दोन टप्प्यांत पुनर्विकास करण्याचा निर्णय २००९ मध्ये मुंबई मंडळाने घेतला. मात्र संरक्षण विभागाच्या नियमानुसार येथे उंचीची मर्यादा असल्याने पहिल्या टप्प्यात ५२५ गाळ्यांपैकी ३३५ गाळ्यांचे काम हाती घेतले. त्यानुसार येथे चार मजली इमारतीच मंडळाला बांधता आल्या. तर दुसऱ्या टप्प्यातील १०९ गाळ्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला, मात्र अद्यापही या १०९ गाळ्यांचा पुनर्विकास झालेला नाही.

संरक्षण विभागाच्या अटींमुळे विकास रखडला

कुलाब्यातील उर्वरित १०९ गाळ्यांचा पुनर्विकास सुरू करण्याच्या काळात अर्थात डिसेंबर २०२२ मध्ये संरक्षण विभागाने काही अटी शिथिल केल्या. त्यामुळे येथे २२ मजली इमारती बांधणे शक्य होणार असल्याने मंडळाने यासंबंधीचा व्यवहार्यता अभ्यास हाती घेतला. या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाला काही हजार अतिरिक्त घरे कुलाब्यासारख्या परिसरात सोडतीसाठी उपलब्ध होणार होती. मात्र संरक्षण विभागाने शिथिल केलेल्या अटी पुन्हा लागू करण्यात आल्या आणि कुलाबा संक्रमण शिबिराचा पुनर्विकास कागदावरच राहिला. दरम्यान, मंडळाकडून १०९ गाळ्यांच्या जागी तीन मजली इमारती बांधण्यात येणार होत्या, तोही प्रस्ताव बारगळला असून कुलाब्यातील १०९ गाळे अजूनही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.

१०९ गाळ्यांचा विकास सध्याच्या धोरणानुसार

याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर यांना विचारले असता त्यांनी उंचीच्या मर्यादेमुळे कुलाबा संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करून तिथे २२ मजली इमारती उभारणे शक्य नाही. पण जे उर्वरित १०९ गाळे आहेत, त्यांचा पुनर्विकास सध्या धोरणानुसार, तसेच उंचीच्या मर्यादेनुसार करण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.