मुंबई : विदर्भासह, मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघत असताना थंड हवेची ठिकाणेही तापली आहेत. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी थंडाव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळी धाव घेणाऱ्या पर्यटकांचाही विरस झाला आहे. माथेरान येथे सरासरी कमाल तापमानाची नोंद ही मुंबईपेक्षाही अधिक आहे तर महाबळेश्वर येथेही पारा चढता आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची गर्दी असते. यंदा मात्र राज्यातील इतर भागांप्रमाणेच या ठिकाणीही उकाडा जाणवत आहे. माथेरान येथे रविवारी सरासरी ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान मुंबईपेक्षाही अधिक होते. मुंबई शहरात सांताक्रुझ केंद्राने ३८.१ अंश सेल्सिअस तर, कुलाबा केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदवले. महाबळेश्वर येथे सरासरी ३४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हेही वाचा.माजी पोलीस आयुक्त संजय पांडेही उत्तर-मध्य मुंबईतून इच्छुक, अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता दरम्यान हवामान विभागाने ठाणे, मुंबईत रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्याचा प्रत्यय मुंबईकरांना आला. सांताक्रूझ येथे कमाल तापमानात शनिवारीपेक्षा दोन अंशांनी वाढ झाली. कुलाबा येथे तापमानात फारशी वाढ झाली नाही, तरी दोन्ही केंद्रावर हंगामी सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. सोमवारीही मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला असून कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. ठाणे जिल्ह्यातही पुन्हा एकदा सरासरी तापमान चाळीसपेक्षा अधिक नोंदले गेले. रविवारी सरासरी ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पालघर येथे देखील रविवारी कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशापार गेला.तेथे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हेही वाचा.मुंबई : मतदान केंद्रांवर ‘आपला दवाखाना’ आरोग्य सेवा पुरवणार सोलापूर येथे सर्वाधिक तापमान राज्यातील सर्वाधिक सरासरी कमाल तापमानाची नोंद रविवारी ४३.७ अंश सेल्सिअस सोलापूर येथे झाली. जळगाव (४२.२), मोहोळ(४२.५), नांदेड (४२.४), सांगली (४१), सातारा (४०.५) येथेही तापमान अधिक होते. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथे कमाल व किमान तापमानात वाढ होऊन. काही भागात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.