मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबरोबर पुढील दोन – तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. पुढील दोन – तीन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान किमान तापमान १६ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १८.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात सोमवारी सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली. तेथे ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल गोंदिया येथे ९ अंश सेल्सिअस, अमरावती ९.६ अंश सेल्सिअस, नांदेड ९.९ अंश सेल्सिअस, मालेगाव ९ अंश सेल्सिअस, जळगाव ९.४ अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगर येथे ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, थंडीची लाट पुढील दोन – तीन दिवस कायम असल्याने या भागात गारठ्याचे प्रमाण सर्वाधिक राहील.

थंडीच्या लाटेचा इशारा कुठे ?

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.