मुंबई : दक्षिणेकडून आणि पूर्वेकडून येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेत केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिणेकडून आणि बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात ढग राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात पश्चिमी विक्षोपामुळे (थंड वाऱ्यामुळे) राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाच्या काही भागात रविवारी थंडीची लाट होती. पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेची स्थिती कायम राहणार आहे. ताशी ४० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहून बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी, २७ रोजी हिमाचल प्रदेशासह लेह, लडाख, काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे. या काळात वादळी वारे ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

संपूर्ण उत्तर भारतात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३० जानेवारीच्या रात्रीपासून आणखी एक पश्चिमी विक्षोप सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा थंडीची लाट सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशापर्यंत थंडीचा प्रभाव जाणविणार आहे. या थंडीच्या लाटेचा परिणाम काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात जाणविण्याचा अंदाज आहे.

दिल्लीत तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसवर

राजधानी दिल्लीत तापमान रविवारी ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंतखाली आले होते. काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस होत आहे. थंड वारे वाहत असल्यामुळे काश्मीरमधील दल सरोवर गोठले आहे. काश्मीरमधील अनेक ठिकाणी पहाटे रस्ते आणि बागा बर्फाच्या थरांनी झाकल्या जात आहेत. हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर आणि मध्य भारतात पुढील ४८ तासांत थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.