मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्याच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. किमान तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दिवसाही गार, बोचरे वारे वाहत असल्यामुळे राज्यभरात थंडी जाणवत आहे. राज्यात मंगळवारी जळगाव येथे सर्वात कमी ९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा जोर वाढला आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर कमी झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. कमाल तापमानातही सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. दुपारी तासभर ऊन पडल्यानंतर लगेच पुन्हा थंड, बोचरे वाहत आहे. त्यामुळे दिवसभर हवेत गारठा जाणवत आहे. मुंबईत आणि ग्रामीण भागातही थंडीला तोंड द्यावे लागत आहे. जळगाव येथे मंगळवारी राज्यातील सर्वात कमी ९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. खानदेश आणि विदर्भात तापमानातील घट कायम आहे.

राज्यात मंगळवारी किमान तापमानात सरासरी एक ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली. विदर्भात गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस, यवतमाळ ११.४ अंश सेल्सिअस, वाशिम ११.८ अंश सेल्सिअस, अमरावती ११.७ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात बीड येथे ११.४ अंश सेल्सिअस, कोकणात डहाणू १७.४ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ १९.८ अंश सेल्सिअस त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर येथे ११.४ अंश सेल्सिअस, मालेगाव ११.२ अंश सेल्सिअस आणि नाशिक येथे १०.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे पुढील तीन दिवस कमाल-किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

दोन ते तीन दिवसांनी तापमानात पुन्हा वाढ

सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सर्वत्र किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. ही घट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील. त्यानंतर पुन्हा एक ते दोन अंशांनी तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.