प्लास्टिक देण्याचा नागरिकांचा उत्साह दीड महिन्यात मावळला

प्लास्टिक बंदीच्या घोषणेनंतर महानगरपालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाइनच्या माध्यमातून स्वतकडील प्लास्टिक देण्याचा नागरिकांचा उत्साह मावळला आहे. पहिल्या पंधरा दिवसांत १०३ टन प्लास्टिक गोळा झाल्यावर मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात केवळ २२ टन प्लास्टिकची भर पडली आहे. कुलाबा ते भायखळा, कांदिवली, दहिसर तसेच भांडुप वगळता इतर कोणत्याही उपनगरातून १५ मे नंतर प्लास्टिकची भर पडलेली नाही.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. त्यानंतर प्लास्टिक बंदीची मुदत वाढवून २२ जून करण्यात आली. दरम्यानच्या काळात महानगरपालिकेने प्लास्टिक बंदीच्या जागृतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक गोळा करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आला. १८००२२२३५७ या टोल फ्री क्रमांकाला पहिल्या १५ दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला. गृहनिर्माण संस्था, व्यवसायिक संघटनांनी (उदा. उपाहारगृह संघटना / विक्रेता संघटना) १० किलोपेक्षा अधिक वजनाचे प्रतिबंधित प्लास्टिक वा थर्माकोल गोळा केल्यास ते उचलून नेण्याची व्यवस्थाही करण्यात आली. पहिल्या पंधरवडय़ात, १५ मेपर्यंत १०३ टन प्लास्टिक गोळा करण्यात आले. मात्र त्यानंतर हा प्रतिसाद कमी झाला आहे. ३१ मेपर्यंतच्या दुसऱ्या पंधरवडय़ात अवघे २२ टन प्लास्टिक गोळा झाले आहे.

हेल्पलाइनच्या माध्यमातून आतापर्यंत १२५ टन प्लास्टिक गोळा करण्यात आले असले तरी वॉर्डमध्ये असलेल्या कचरा संकलन केंद्रात मात्र अवघे साडेतीन टन प्लास्टिक गोळा झाले. स्वतकडील प्लास्टिक पालिकेकडे सुपूर्द करण्यासाठी प्रत्येक विभागात मंडयांजवळ प्लास्टिक संकलन पेटय़ा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यात नागरिकांनी प्लास्टिकऐवजी इतरच कचरा टाकणे सुरू केले. सध्या हे सर्व प्लास्टिक साठवून ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील नोंदणीकृत संस्थेकडे हे प्लास्टिक पुनर्चक्रीकरणासाठी दिले जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्लास्टिकविरोधी पथनाटय़

जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत महानगरपालिकेकडून जनजागृती मोहीम घेतली जात आहे. प्लास्टिक टाळण्याबद्दल व कापडी पिशवीचा आग्रह धरणारा रथ घेऊन पाच ते दहा जूनदरम्यान शहरातील रेल्वे स्थानक परिसरात पथनाटय़े केली जाणार आहेत. पाच ते सात जूनदरम्यान पश्चिम उपनगरात, ८ जून रोजी पूर्व उपनगरत तरर ९ आणि १० जून रोजी दक्षिण भागात या रथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे, असे पालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

घटता क्रम.. पहिल्या पंधरवडय़ात एच पश्चिम म्हणजे वांद्रे ते विलेपार्ले (पश्चिम)दरम्यानच्या उपनगरातून सर्वाधिक ३० टन प्लास्टिक गोळा झाले होते. मात्र दुसऱ्या पंधरवडय़ात त्यात कोणतीही भर पडली नाही. कुलाबा ते भायखळा आणि कांदिवली, दहिसर तसेच भांडुप वगळता इतर सर्व उपनगरांत दुसऱ्या पंधरवडय़ात प्लास्टिकची भर पडलेली नाही. मे महिन्याअखेरच्या माहितीनुसार एच पश्चिमपाठोपाठ डी विभागातून २० टन, सी विभागातून १६ टन तर ई विभागातून १५ टन प्लास्टिक गोळा झाले आहे.