मुंबई : राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार बुधवार, २० ऑक्टोबर पासून मुंबईतील महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले असून संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांना बुधवारपासून नियमित वर्ग सुरू करण्यास सांगितले आहे. शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयांची दारे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने गेली दीड वर्ष ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून महानगरपालिकांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाना घ्यायचा आहे. सध्या मुंबईतील संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आल्याने बुधवारपासून महाविद्यालये सुरू करण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार विद्यापीठानेही महाविद्यालये सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली असून स्थानिक पातळीवरील करोनास्थिती, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांंचे लसीकरण याबाबत स्थानिक प्राधिकरणांनी महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.