|| इंद्रायणी नार्वेकर
६० ठिकाणे धोकादायक, २० अतिधोकादायक
मुंबई : मुंबईत २९९ ठिकाणी दरडीवर वसाहती असून त्यापैकी ६० वसाहती या धोकादायक परिस्थितीत, तर २० वसाहती अतिधोकादायक परिस्थितीत आहेत. २०१४ मध्ये पुण्यातील माळीण येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने मुंबईत केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली होती. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणात काही शिफारशी करण्यात आल्या होत्या. मात्र अनेक प्राधिकरणांच्या सीमारेषांमुळे या वसाहती अद्याप तशाच धोकादायक अवस्थेत आहेत.

गेल्या आठवड्यात माहुल आणि विक्रोळी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईत दरडींवरील वसाहतींचा प्रश्न पुन्हा  ऐरणीवर आला आहे.   अशी दुर्घटना होऊ नये म्हणून पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दरडी कोसळण्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाची (जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) मदत घेण्यात आली होती. त्यानुसार संस्थेने २०१८ मध्ये मुंबईतील या ठिकाणांची पाहणी करून पालिकेला २०१९ मध्ये आपला अहवाल सादर केला होता.

या सर्वेक्षणात डोंगर उतारावर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या जमिनीची प्रत, जमिनीच्या उताराची मजबुती, संबंधित जमिनीवर असलेल्या दगड-खडकांचे प्रमाण, अशा बाबींचा अभ्यास करण्यात आला होता. शिवाय धोकादायक आढळलेल्या ठिकाणी २००६ ते २०१६ या काळात पडलेल्या पावसाचे प्रमाण, अतिवृष्टी झाल्यानंतर निर्माण झालेली स्थिती यांचा अभ्यासही करण्यात आला.

तसेच उपाययोजनाही सुचवण्यात आल्या होत्या. या सर्वेक्षणानुसार मुंबईतील दरडींवरील २० वसाहती अतिधोकादायक आहेत, भांडुप, विक्रोळी पार्क साइट, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, जोगेश्वरी आणि चेंबूरसारख्या ठिकाणी डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांना धोका आहे. अतिधोकादायक २० ठिकाणांपैकी सर्वात जास्त ठिकाणे ही घाटकोपरमध्ये आहेत. त्याखालोखाल भांडुप  तर उर्वरित ठिकाणे ही शिवडी, अंधेरी पश्चिम, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, मुलुंडमध्ये आहेत.

पालिकेचे अधिकार मर्यादित

याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता, दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या संभाव्य वसाहती बहुतांशी सरकारी जमिनीवर किंवा म्हाडाच्या जमिनीवर आहेत. अशा ठिकाणी कारवाई करण्याचे पालिकेला अधिकार नाहीत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात आम्ही या वसाहतींना नोटीस देतो, तसेच आपत्ती घडली तरी तिथे पोहोचणे अवघड होऊ नये, याकरिता आम्ही विभाग पातळीवर धोकादायक ठिकाणांचा आढावाही घेतल्याचे सांगितले. अशा धोकादायक वसाहतीतील रहिवाशांना आम्ही आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अन्य प्राधिकरणांच्याही बैठका घेऊन आम्ही त्यांना कारवाई करण्याबाबत सूचना देत असल्याचे म्हणाले.

’दरड कोसळण्याचा धोका असलेली एकूण ठिकाणे – २९९

’कमी धोका असलेली ठिकाणे -१३२

’कमी ते मध्यम

धोका-४० ’मध्यम ते जास्त धोका-४०

’कोणताही धोका नाही -६२

’पुढील अभ्यासासाठी निश्चित केलेली ठिकाणे- ४५

’अतिधोकादायक -२० ठिकाणे