मुंबई :  ‘‘कुटुंबप्रमुख म्हणून सांगतो, अजून वेळ गेलेली नाही, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढूया. आजही मला तुमची काळजी वाटते’’, अशी भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मंगळवारी घातली. त्यास प्रत्युत्तर देत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी परतीचे दोर कापले गेल्याचे संकेत दिले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकट आल्याने गेले काही दिवस शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांसाठी आव्हानाची भाषा वापरत इशारे दिले. त्यावेळी नाराजांसाठी समजावणीचा सूर हवा, आव्हानाची भाषा नको, अशी भावना शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेवरील राजकीय संकट दूर करण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे सरसावत नाराज आमदारांसाठी समजुतीचा सूर लावला. त्यांनी जाहीर पत्राद्वारे बंडखोर आमदारांना साद घातली आहे.

‘‘आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच जण संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीही संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही. माझे आपल्या सगळय़ांना आवाहन आहे, आपण या, माझ्यासमोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल’’, असे या पत्रात म्हटले आह़े  ‘‘कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान-सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटते’’, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिंदे यांचे प्रत्युत्तर

शिवसेनेचे कोणते आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. त्याचबरोबर लवकरच आम्ही मुंबईला परतणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घालताना बरेच आमदार संपर्कात असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत हेही वारंवार गुवाहाटीत असलेले १५ ते २० आमदार संपर्कात असल्याचा दावा करत असतात. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत माध्यमांना सामोरे जात मुख्यमंत्र्यांना संपर्कातील शिवसेना आमदारांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले. 

उद्धव ठाकरे यांच्या समजुतीच्या सुरावरही एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरे, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदुविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?, असा सवाल शिंदे यांनी केला.

‘फडणवीस यांची मदत’

एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शिंदेगटाचे दीपक केसरकर यांनीही आघाडी सरकारला आव्हान दिले. आमच्याकडे बहुमत आहे. विधासभेत ते सिद्ध होईल. माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. रात्री १२ वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात. आज जर आम्ही एकटे पडलो, तर त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडले? फडणवीसांनी स्वत: हून आम्हाला संरक्षण दिले. भाजपशासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळत आहे, असे केसरकर म्हणाले.

उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हटविण्यासाठी देण्यात आलेल्या नोटिशीवर शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे गटातील ३४ आमदारांनीच स्वाक्षऱ्या केल्याने ही पक्षविरोधी कृती किंवा वर्तन ठरविले जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी शिवसेना पक्ष सोडला नसल्याचे बंडखोर गटाचे म्हणणे असताना आणि सत्ताधाऱ्यांनीच पाठिंबा दिलेले उपाध्यक्ष असताना दोन तृतीयांशपेक्षा कमी आमदारांनी दिलेली नोटीस वैध आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 

फडणवीस यांची शहा, नड्डा यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांच्यासह मंगळवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते. फडणवीस व जेठमलानी यांनी अधिवक्ता तुषार मेहता, ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी व अन्य विधिज्ञांचीही भेट घेतल्याचे समजते. राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असल्याचे दिसत़े

बंडखोर मंत्र्यांची हकालपट्टी?

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह नऊ मंत्र्यांची लवकरच मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार आहे. या मंत्र्याची खाती सोमवारी काढून घेण्यात आली होती़  आता त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतला असून, त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच राज्यपालांना पत्र पाठविणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या भावनांचा आदर करतो. आपण या, माझ्यासमोर बसा़  यातून निश्चित मार्ग निघेल़

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख

एकीकडे, तुमचे पूत्र आणि प्रवक्त्यांनी बंडखोरांचा बाप काढायचा, आणि दुसरीकडे, तुम्ही आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?

– एकनाथ शिंदे, बंडखोर नेते