* केसरीची नवीन पर्यटन शिक्षण अकादमी
* जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून अभ्यासक्रम
मराठी लोकांना परदेश भ्रमणाची अक्षरश: चटक लावणाऱ्या केसरी ट्रॅव्हल्सला यंदा २९ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षांत ‘केसरी’च्या व्यवस्थापकीय मंडळात अनेक बदल झाले असून ‘केसरी’ची धुरा शैलेश पाटील यांनी आपल्या खांद्यांवर घेतली आहे. ‘केसरीसंगे चला फिरू या’ असे सांगत लोकांना देशविदेशाची सफर घडवणारे ‘केसरी’ आता विद्यार्थ्यांना पर्यटनाचे धडेही देणार आहे. ‘केसरी संगे चला शिकू या’ असे म्हणत ‘केसरी’ त्यांची पहिलीवहिली ट्रॅव्हल अकादमी सुरू करत असून पहिली तुकडी जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून धडे घ्यायला सुरुवात करेल, अशी माहिती केसरीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
‘केसरी’ने आतापर्यंत लाखो मराठी पर्यटकांना उत्तम सेवा दिली आहे. हेच ब्रीद आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. मात्र केवळ पर्यटनावर भर न देता तरुणांना या क्षेत्राचे असलेले आकर्षण लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचाही आमचा विचार आहे, असे पाटील म्हणाले. यासाठी ‘केसरी’ने केसरी ट्रॅव्हल अकादमी स्थापन करण्याचे ठरवले आहे. सहा वर्षांपूर्वीही आम्ही हा प्रयोग केला होता. मात्र त्या वेळी स्वत:च्या जागेअभावी आम्हाला ही योजना पुढे चालवता आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या अकादमीमध्ये १२ उत्तीर्ण झालेल्या किंवा अनुत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी खास दहा महिन्यांचा प्रशस्तिपत्रक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमातील चार महिने त्यांना पुस्तकी शिक्षण दिले जाणार
आहे.
त्यानंतर पुढील सहा महिने ‘केसरी’तील विविध विभागांमध्ये त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. हे विद्यार्थी प्रत्येक विभागात किमान दोन महिने प्रशिक्षण घेतील. विशेष म्हणजे या प्रशिक्षणादरम्यान त्यांना पाठय़वृत्ती म्हणून काही पैसे दिले जातील. विद्यार्थ्यांनी भरलेले सर्व शुल्क या पाठय़वृत्तीच्या पैशांतून फेडण्याचा आमचा विचार आहे, असेही शैलेश पाटील यांनी सांगितले.

ठळक वैशिष्टय़े
* प्रत्येक तुकडीत ४० विद्यार्थी
* विद्यार्थी १२वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण
* वयोमर्यादा २५ वर्षे २० ते ३० हजार शुल्क
* प्रत्यक्ष प्रशिक्षणादरम्यान पाठय़वृत्ती म्हणून सर्व पैसे परत
* पर्यटन व्यवसायातील व्यावसायिकांकडून मार्गदर्शन