मुंबई: राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना स्वातंत्रदिनापर्यंत मराठी अनिवार्य केल्यानंतर परिवहन विभागाने आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यवसायिक वाहन चालकांनाही मराठी अनिवार्य केली आहे. व्यवहारिक मराठी न येणाऱ्या वाहन चालकांचा तीन महिने वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे. हा नियम सातत्याने भंग केल्यास परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

राज्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याच्या नियमात अडथळा येणाऱ्या महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये परिवहन विभागाने सुधारणा केली आहे. त्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना १०० दिवस मराठी शिकण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या काळात परिवहन विभागाने जुन्या वाहन कायद्यात थोडी सुधारणा करुन मोटार वाहन नियम २०२६’नुसार नियम ४ मध्ये मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान अनिवार्य ही अट समाविष्ट केली. नियम २२ मध्ये ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित चालकाकडे मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास परवाना प्राधिकरणाला लेखी कारणे नोंदवून कारवाई करता येणार आहे. प्रथम परवाना जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी निलंबित करता येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास हा परवाना रद्द करण्याचा अधिकार प्राधिकरणाला राहणार आहे. ही अट केवळ चालकांपुरती मर्यादित नसून परमिटधारकांनाही लागू करण्यात आली आहे. सुधारित नियम ७८ नुसार संबंधित परमिटधारकाकडेही मराठीचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक आहे.

ॲप-आधारित मोटार कॅबच्या परमिटच्या नूतनीकरणासाठीही परमिटधारकाचे मराठी ज्ञान समाधानकारक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सुधारणांमुळे नियमांमधील संदिग्धता दूर होऊन प्रवासी वाहतूक क्षेत्रात मराठीच्या व्यवहारिक वापराची अट अधिक प्रभावीपणे लागू करता येणार आहे. प्रवाशांशी संवाद साधणे, त्यांच्या सूचना व तक्रारी समजून घेणे, सुरक्षित आणि सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.