मुंबई : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात शुक्रवारी तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली. गॅस दरवाढीमुळे विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच, केंद्र शासनाच्या या निर्णयाबाबत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (वेस्टर्न इंडिया) संताप व्यक्त केला असून या निर्णयाचा हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायावर गंभीर होण्याची शक्यता असोसिएशनने वर्तविली आहे.

आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अन्य देशांसह भारतात तीव्र गॅसटंचाईची समस्या निर्माण झाली. अद्यापही त्या स्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. गॅसटंचाईमुळे अनेक हॉटेल – रेस्टॉरंट, बेकऱ्यांना तात्पुरते टाळे लागले असून व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांचे व्यवसाय संकटात आले आहेत.

केंद्र शासनाने शुक्रवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ केली. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून दर महिन्याला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली जात आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये १९५.५० रुपये आणि मार्चमध्ये १४४ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यांनतर आता पुन्हा ९९३ रुपयांची वाढ केल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. आधीपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सिलिंडरची गरज भासते. त्यामुळे सर्वाधिक परिणाम याच क्षेत्रावर झाला आहे. विशेषतः लहान हॉटेल्स, खानावळी तसेच मोठ्या प्रमाणावर अन्नपुरवठा करणाऱ्या व्यवसायांवर याचा अधिक ताण पडण्याची शक्यता आहे. गॅसटंचाईमुळे पूर्वीपासूनच हॉटेल्स व्यवसायावर संकट ओढवले असताना सातत्याने होणारी वाढ व्यावसायिकांची चिंता वाढवत आहे. अनेक ठिकाणी मर्यादित अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवले जात असून काही ठिकाणी पर्यायी इंधनाचा वापर केला जात आहे.

मात्र, हे उपाय दीर्घकाळ नसल्याने गॅसटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची आर्थिक स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय टिकविणे कठीण होणार असल्याचे मत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आले आहे.

दरवाढीचा परिणाम केवळ हॉटेल – रेस्टॉरंटपुरते मर्यादित न राहता खाद्यपदार्थांचे दर, बँक्वेट सेवा, पर्यटनाशी संबंधित उद्योग आणि पुरवठा साखळीवरही होतील. एलपीजी दरवाढीमुळे मेन्यू दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवाढ तातडीने मागे घेऊन एलपीजीचे दर स्थिर ठेवावेत. अन्यथा, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणारा हॉटेल उद्योग येईल, अशी चिंता हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया)चे प्रवक्ते प्रदीप शेट्टी यांनी व्यक्त केली.