मुंबई : भारतात व्यावसायिक वैमानिक परवान्यांची संख्या वर्षानुवर्षे सतत वाढत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २०२६च्या पहिल्या सहामाहीत डीजीसीएने १,३३१ व्यावसायिक पायलट परवाने जारी केले. यापैकी ४१ टक्के प्रशिक्षणार्थिंनी परदेशात प्रशिक्षण घेतले आहे. करिअरच्या संधी व वाढत्या मागणीमुळे तरुणांचा वैमानिक होण्याकडे कल वाढत आहे.
विमान कंपन्यांचे वाढते जाळे व नवीन विमानांची संख्या वाढत असल्याने वैमानिकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतीय उड्डाण संस्थांकडून प्रशिक्षित झालेल्यांना एकूण ७९१ परवाने जारी केले आहेत. परवान्यांमध्ये वाढ झाली असली तरी, सरकार देशातील वैमानिक प्रशिक्षण पायाभूत सुविधा आणि नियमांमध्ये सक्रियपणे सुधारणा करीत आहे.
यावर्षी ३० जूनपर्यंत, भारतीय उड्डाण प्रशिक्षण संस्थांमधील (एफटीओ) ७९१ प्रशिक्षणार्थी व परदेशी एफटीओमधील ५४० प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक पायलट परवाने जारी करण्यात आले. २०२५ व २०२४ मध्ये अनुक्रमे १,६५२ व १,३४७ प्रशिक्षणार्थींना परवाने जारी करण्यात आले. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये एकूण १,६२२ परवाने जारी केले होते. २०२२ मध्ये १,१६५ जणांना परवाने दिले होते. सध्या, देशभरात ६३ तळांवर ४१ डीजीसीए-मान्यताप्राप्त एफटीओ असून त्यांच्याकडे ४०० हून अधिक विमाने आहेत.
३० हजार वैमानिकांची गरज
विमान कंपन्यांच्या विस्तारामुळे आगामी दशकात ३० हजारांहून अधिक वैमानिकांची गरज भासणार आहे. परदेशी संस्थांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विमान प्राधिकरणाने ७ विमानतळांवर ११ नवीन फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन स्लॉट मंजूर केले आहेत. देशात सध्या ४१ डीजीसीए-मान्यताप्राप्त फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कार्यरत आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१६ पासून देशात एकूण ४,६१२ व्यावसायिक वैमानिक परवाने जारी केले आहेत.
