दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्समधील (आरसीएफ) बॉयलरच्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी ‘आरसीएफ’ने समिती नेमली आहे. दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत. दरम्यान, आरसीएफ पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या स्फोटात कोणाचा निष्काळजीपणा होता, हे स्पष्ट होण्यासाठी आरसीएफच्या अहवालाची वाट पाहात असून त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

माहुल, चेंबूर येथील आरसीएफमधील बॉयलर क्रमांक २ मध्ये शनिवारी सायंकाळी स्फोट झाला. देखभालीसाठी हा बॉयलर बंद ठेवण्यात आला होता. अल-आकीब इंजिनीअरिंग वर्क्‍स या कंपनीकडे देखभालीचे काम देण्यात आले होते. कंपनीचे सहा कंत्राटी कामगार या बॉयलरच्या ठिकाणी काम करत होते, तर आरसीएफचे दोन कर्मचारी त्यावर लक्ष ठेवून होते. जोडकाम सुरू असताना स्फोट होऊन कामगार ३० ते ४० फूट हवेत उडाले. या स्फोटात ३ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले होते. जखमींपैकी दोघांना रविवारी घरी सोडण्यात आले.