मुंबई: नानाचौक परिसरातील सचिनम् हाइट्स इमारतीमध्ये झालेल्या आग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  आगीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी समिती नेमण्याचे आणि पंधरा दिवसांच्या आत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या समितीमध्ये डी विभागाचे साहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) (शहर), उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांचा देखील समावेश आहे. आग लागल्याचे नेमके कारण, इमारतीच्या आराखड्यामध्ये  विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची शहानिशा करणे या अनुषंगाने ही समिती चौकशी करणार आहे.

दरम्यान, मुंबई महानगरातील बहुमजली आणि उंच इमारतींची संख्या तसेच आगीच्या वाढत्या दुर्घटना लक्षात घेता या इमारतींचे नियमितपणे विद्युत विषयक परीक्षण करण्यासंदर्भात तसेच विद्युत संरचनेत बदलामुळे होणाऱ्या आधीच्या घटना रोखण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती.

केंद्रीय विद्युत नियमन २०१० मधील कलम ३६ अन्वये, १५ मीटर आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या सर्व उंच इमारतींचे, विद्युत निरीक्षकांच्या माध्यमातून नियमितपणे विद्युत परीक्षण करण्यासंदर्भात यावेळी सांगण्यात आले होते आणि त्यास मुख्य विद्युत निरीक्षकांच्या प्रतिनिधींनी संमती देखील दर्शवली होती. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.  नायर व कस्तुरबा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. 

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना  सरकार पाच लाखांची नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार

सचिनम हाइटसमधील आगीच्या दुर्घटनेनंतर जखमींना खासगी रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. रुग्णालयांनी नकार दिल्यामुळे मृतांचा आकडा वाढला असल्याचा आरोप करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. दुर्घटनेतील जखमींची संख्या जसजशी वाढत गेली तसतसे रुग्णांना विविध रुग्णालयात दाखल केले जात होते. मात्र  रिलायन्स, मसीना, भाटीया, वोकहार्ट रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीच्या अगदी समोर असलेल्या भाटीया रुग्णालयानेही जखमींकडून अनामत रकमेची मागणी केल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे.  या रुग्णालयांना जाब विचारणार असल्याचे  महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.  दरम्यान, भाटिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यदेव मलिक यांनी सांगितले आहे की भाटिया रुग्णालयात २० रुग्ण दाखल करण्यात आले होते. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करून घेतले व त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.  जखमींपैकी पाच जणांना प्राथमिक उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. तर एक व्यक्ती दाखल करण्यापूर्वीच मृत झाली होती. तर गंभीर भाजलेल्या दोन जखमींना कस्तुरबा व मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सध्या भाटिया रुग्णालयात १२ जखमी दाखल आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर अन्य सहा जखमींची प्रकृती स्थिर आहे. नाकातोंडात धूर गेल्यामुळे या रुग्णांना श्वासोच्छवासास त्रास होत असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

२२३ इमारतींना नोटिसा

अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणेची तपासणी करून यंत्रणा उत्तम स्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे इमारतींना बंधनकारक असते. मात्र अनेक इमारती त्याचे पालन करीत नाहीत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत अशा २२३ इमारतींना नोटिसा बजावल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी २३ इमारतींनी अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी करून प्रमाणपत्र दिले आहे. तर १३३ इमारती अद्याप नोटीस कालावधीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committee to investigate fire akp
First published on: 23-01-2022 at 01:08 IST