मिरवणुकीतील वादातून लालबागमध्ये तणाव

दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेला वाद आणि वादातून तरुणाला झालेल्या मारहाणीमुळे रविवारी रात्री लालबाग परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेला वाद आणि वादातून तरुणाला झालेल्या मारहाणीमुळे रविवारी रात्री लालबाग परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या वेळी झालेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याचे समजते. या तणावाच्या पाश्र्वभूमीवर लालबागमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आली.
लालबाग परिसरातून सालाबादप्रमाणे ईदनिमित्त मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यातूनच दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे लालबाग व परळ परिसरात पसरले. मारहाणीचे वृत्त समजताच परिसरातील रहिवासी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. काही समाजकंटकांनी या वेळी दगडफेकही केली. त्यात काही जण जखमी झाल्याचे समजते.
या तणावाच्या पाश्र्वभूमीवर येथील पोलीस बंदोबस्तात तातडीने वाढ करण्यात आली. राजकीय नेत्यांनीही या प्रकाराची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त राकेश मारियाही घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत होते. रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थितीमुळे तणाव निवळल्याचे समजते. दरम्यान, लालबागमधील घटनेचे वृत्त समाजमाध्यमांतून पसरल्यानंतर वरळी भागातही काही तरुणांनी रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Communal tension in lalbaug