आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांना अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू होणार आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. मात्र, आजच्या निर्णयानुसार, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीतदेखील हे अनुकंपा धोरण लागू करण्यात येईल. तसेच न्यायाधीशांच्या वेतनश्रेणीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तकांचा मोबदला वाढवण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे.

आज घेण्यात आलेले महत्वाचे सहा निर्णय खालीलप्रमाणे –

• शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू. निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती देणार
(सामान्य प्रशासन)

• कुटुंब न्यायालयातील सरळसेवेने नियुक्त न्यायाधीशांना जिल्हा न्यायाधीश (प्रथम प्रवेश, निवड श्रेणी, उच्च समयश्रेणी) वेतनश्रेणी लागू
(विधि व न्याय विभाग)

• राज्य तंत्रशिक्षण मंडळ, अधिनियम-१९९७ मधील कलमांमध्ये सुधारणा
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

• आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तकांचा मोबदला वाढविला (सार्वजनिक आरोग्य विभाग)

• केंद्राच्या योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनाबाबत बँक खाती उघडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा (वित्त विभाग)

• कृषी आधारीत व अन्न प्रक्रिया उद्योगांना सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मोठ्या व विशाल प्रकल्पांसाठी विहीत गुंतवणूक, रोजगाराचे निकष आणि प्रोत्साहने सुधारीत करणार (उद्योग विभाग)