अपघातात डावा पाय गमावलेल्या तरुणाला ७२ लाखांची भरपाई

अपघात, झालेल्या जखमा आणि पायावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे या तरुणाला अतोनात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत.

मुंबई : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडके त डावा पाय गमावलेल्या ३० वर्षांच्या तरुणाला अपघातामुळे वैवाहिक जीवनासह जीवनातील आनंदाशी तडजोड करावी लागणार आहे, असे निरीक्षण नोंदवत त्याला सव्याज ७२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिले.

२०१२ मध्ये झालेल्या या अपघातात या तरुणाने आपल्या ३५ वर्षांच्या मित्रालाही गमावले. त्याच्या मित्राच्या कुटुंबीयांना न्यायाधिकरणाने २०१९ मध्ये स्वतंत्र आदेशाद्वारे ३९ लाख रुपयांच्या भरपाईचे आदेश दिले होते. नुकसानभरपाईच्या रकमेत या तरुणाला अपघातामुळे सहन करावा लागलेल्या वेदनांसाठी दीड लाख रुपये, तर जीवनाच्या सुविधांच्या झालेल्या नुकसानाचे दोन लाख रुपयेही देण्यात आले आहेत.

अपघात, झालेल्या जखमा आणि पायावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे या तरुणाला अतोनात वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. या सगळ्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर आघात झाला असून तो पुढेही कायम राहील. त्याला सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगता येणार नाही, कामे करता येणार नाहीत. त्याचे वय लक्षात घेता त्याच्यासाठी हे दु:ख खूप आहे, असे न्यायाधिकरणाने आदेशात नमूद केले आहे.

न्यायाधिकरणाने मात्र त्याच्या प्राप्तिकर परताव्याच्या नोंदी प्रामुख्याने विचारात घेतल्या. त्यानुसार या तरुणाचे मासिक उत्पन्न २५ हजार रुपये होते. अपघातानंतर तीन वर्षांपर्यंत काहीच कमावले नसल्याचा दावा तरुणाने केला असला तरी तो स्वीकारणे अशक्य असल्याचेही न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. तीन वर्षे व्यवसाय पुन्हा सुरू न केल्याने घरगुती आणि वैद्यकीय खर्च कसा केला याची माहिती या तरुणाने दिली नसल्याकडे न्यायाधिकरणाने लक्ष वेधले. त्याला एक पाय गमवावा लागला असल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ही बाब मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या जीवनातही बदल होतात. शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग कायमस्वरूपी वेगळा होणे हे केवळ शारीरिक नुकसान नाही, तर जगण्याच्या पद्धतीवरही त्याचा परिणाम होतो.

प्रकरण काय?

या तरुणाने २०१३ मध्ये ट्रकचालक आणि विमा कंपनीविरोधात न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता. घटनेच्या दिवशी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा तरुण आणि त्याचा मित्र दुचाकीवरून कल्याणला जात होते. त्याच वेळी मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात त्याला पाय गमवावा लागला आणि त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आधी तो हॉटेलचा व्यवसाय करत होता व त्यातून तो ७० हजार रुपये कमावत होता; परंतु अपघातानंतर हॉटेल बंद करावे लागले, असा दावा करत त्याने १.३३ कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Compensation of rs 72 lakh to a youth who lost his left leg in an accident zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या